चारही नगरसेवक झाले ‘भूमिगत’!
By Admin | Published: October 29, 2015 01:22 AM2015-10-29T01:22:55+5:302015-10-29T01:22:55+5:30
प्रख्यात बिल्डर सूरज परमार आत्महत्या प्रकरणात चौकशीच्या फेऱ्यात असलेले विक्रांत चव्हाण, सुधाकर चव्हाण, नजीब मुल्ला आणि हणमंत जगदाळे हे चौघेही नगरसेवक ‘भूमिगत’ झाले आहेत
ठाणे : प्रख्यात बिल्डर सूरज परमार आत्महत्या प्रकरणात चौकशीच्या फेऱ्यात असलेले विक्रांत चव्हाण, सुधाकर चव्हाण, नजीब मुल्ला आणि हणमंत जगदाळे हे चौघेही नगरसेवक ‘भूमिगत’ झाले आहेत. तर ठाणे न्यायालयाने त्यांना तात्पुरता जामीन देण्यास नकार दिल्यावर पोलिसांनी त्यांना तत्काळ अटक का केली नाही, असा सवाल राजकीय तसेच पोलीस वर्तुळात केला जात आहे.
सुधाकर चव्हाण यांच्या अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी २९ आॅक्टोबर तर विक्रांत, नजीब आणि जगदाळे या उर्वरित तिघांच्या अर्जांची सुनावणी ३१ रोजी ठाणे न्यायालयात होणार आहे. या चौघांनाही तात्पुरता जामीन देण्यास न्यायालयाने मंगळवारी नकार दिल्यामुळे त्यांना कोणत्याही क्षणी अटकेचे संकेत पोलिसांनी दिले होते. या चौघांना न्यायालयाने कोणतेही संरक्षण दिले नसताना ते भूमिगत होईपर्यंत पोलिसांनी वाट का पाहिली, असा संतप्त सवाल केला जात आहे. कासारवडवली पोलिसांची तीन तर गुन्हे अन्वेषण विभागाची तीन अशी सहा पथके या नगरसेवकांच्या मागावर असल्याचे पोलीस सांगत आहेत. जगदाळे यांच्या लोकमान्यनगर येथील घरीही एक पथक दोन वेळा जाऊन आले. तर सुधाकर चव्हाणांच्या शिवाईनगर येथील ‘मंत्रांजली’ निवासस्थानी तसेच मुल्ला यांच्या राबोडीतील कार्यालयात आणि विक्रांत चव्हाण यांच्या वर्तकनगर येथील कार्यालयातही ही पथके गेली होती. मात्र चौघांपैकी कोणीही त्यांच्या हाती लागले नाही. या चौघांचेही मोबाइल नॉट रिचेबल आहेत. त्यांचे नातेवाईक आणि अन्य संबंधित राजकीय नेत्यांकडेही चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
वरिष्ठ अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या बंदोबस्ताला...
पोलीस आयुक्त परमवीर सिंग, सहपोलीस आयुक्त व्ही.व्ही. लक्ष्मीनारायण आणि उपायुक्त व्ही.बी. चंदनशिवे हे कल्याण-डोंबिवलीत मुख्यमंत्र्यांच्या सभेकरिता बंदोबस्ताला गेल्याचे त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले. तपास अधिकारी दिलीप गोरे यांचाही फोन नॉट रिचेबल होता. तर, जनसंपर्क अधिकारी गजानन काब्दुले यांनी अद्याप कोणालाही अटक झालेली नाही, असे सांगितले.
कार्यालयांमध्ये शुकशुकाट...
एरव्ही, वर्तकनगर येथील विक्रांत चव्हाण, शिवाईनगर येथील सुधाकर चव्हाण तर लोकमान्यनगर येथील जगदाळे यांच्या कार्यालयात कार्यकर्ते आणि नागरिकांची गजबज असते. बुधवारी या ठिकाणी कमालीची शांतता आणि शुकशुकाट पाहायला मिळाला. तर, मुल्ला यांच्या राबोडीतील कार्यालयात गर्दी होती. पण, त्यांच्याबाबत कोणीही बोलण्यास तयार नव्हते. (प्रतिनिधी)