पोलिस भरती : 'त्या' उमेदवारांच्या मैदानी चाचणीसाठी चार दिवसांची सवलत
By उद्धव गोडसे | Published: June 17, 2024 06:08 PM2024-06-17T18:08:33+5:302024-06-17T18:09:20+5:30
कोल्हापुरात पोलिस परेड ग्राऊंडवर बुधवारपासून भरती प्रक्रिया, अचूकतेसाठी आरएफआयडी यंत्रणेचा वापर
कोल्हापूर : जिल्हा पोलिस दलाकडील रिक्त २१३ पदांच्या भरतीसाठी बुधवारपासून (दि. १९) पोलिस परेड ग्राऊंडवर प्रक्रिया सुरू होणार आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळ्या घटकांसाठी अर्ज भरलेल्या उमेदवारांना मैदानी चाचणीला हजर होण्यासाठी चार दिवसांची सवलत मिळाली आहे. त्यामुळे भरतीसाठी पात्र ठरलेल्या एकाही उमेदवाराची संधी हुकणार नाही. तसेच मैदानी चाचणीच्या अचूकतेसाठी आरएफआयडी यंत्रणेचा वापर होणार आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सोमवारी (दि. १७) पत्रकार परिषदेत दिली.
राज्यात पोलिस दलातील १७ हजार पदांची भरती प्रक्रिया १९ जूनपासून सुरू होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पोलिस शिपाई पदाच्या १५४ आणि पोलिस चालक पदाच्या ५९ अशा एकूण २१३ जागांसाठी गुरुवारपासून भरती प्रक्रियेला सुरूवात होणार आहे. याची माहिती अधीक्षक पंडित यांनी दिली. ते म्हणाले, 'पोलिस परेड ग्राऊंडवर बुधवारपासून सुरू होणारी मैदानी चाचणी प्रक्रिया पारदर्शक आणि अचूकपणे होईल.
२७ जूनपर्यंत चालणा-या प्रक्रियेचे नियोजन पूर्ण झाले असून, उमेदवारांना त्यांच्या चाचणीचे दिवस निश्चित करून दिले आहेत. त्यानुसार उमेदवारांना पहाटे पाच वाजता परेड ग्राऊंडवर उपस्थित राहावे लागणार आहे. हजेरी, कागदपत्रांची तपासणी, उंची, छाती मोजमाप होईल. त्यानंतर गोळाफेक आणि धावण्याची चाचणी होईल. धावण्याच्या चाचणीसाठी परेड ग्राऊंडवरील ट्रॅकसह कसबा बावडा ते पंचगंगा पूल येथेही पर्यायी व्यवस्था केली आहे.'
'काही उमेदवारांनी वेगवेगळ्या घटकांसाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अर्ज भरले आहेत. त्यांना मैदानी चाचणी देता यावी, यासाठी पहिल्या ठिकाणी चाचणी झाल्यानंतर पुढील जिल्ह्यातील चाचणीला हजर होण्यासाठी चार दिवसांची मुदत मिळाली आहे. त्यासाठी पहिल्या जिल्ह्यात चाचणी झाल्याचे प्रमाणपत्र उमेदवारांना पोलिसांकडून दिले जाणार आहे. यामुळे एकही उमेदवार मैदानी चाचणीपासून वंचित राहणार नाही,' अशी माहिती अधीक्षक पंडित यांनी दिली.
अचूकतेला प्राधान्य
मैदानी चाचणीत अचूकता राहावी यासाठी आरएफआयडी आणि फेस रेकग्नेशन ही संगणकीय यंत्रणा वापरली जाणार आहे. यामुळे डमी उमेदवार भरतीसाठी उतरू शकणार नाहीत. तसेच मैदानी चाचणीच्या वेळा अचूक राहणार आहे.