अवकाळीचे चार बळी
By admin | Published: March 3, 2016 04:47 AM2016-03-03T04:47:56+5:302016-03-03T04:47:56+5:30
राज्यात अवकाळी पावसाचे थैमान सुरूच असून या पावसामुळे चार बळी गेले आहेत. पाथर्डी (अहमदनगर) तालुक्यात जवखेडे खालसा येथील प्रीती जाधव (२८) व डमाळवाडी येथील भारत डमाळे
पुणे : राज्यात अवकाळी पावसाचे थैमान सुरूच असून या पावसामुळे चार बळी गेले आहेत. पाथर्डी (अहमदनगर) तालुक्यात जवखेडे खालसा येथील प्रीती जाधव (२८) व डमाळवाडी येथील भारत डमाळे (१३) हा शाळकरी मुलगा असे दोघे जण वीज पडून बुधवारी ठार झाले. बीड जिल्ह्यातील दादेगाव येथे वादळामुळे विजेची तार अंगावर पडून तानाजी बंडाले (२८) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला, तर शिरुर कासार तालुक्यातील शिरपूर धुमाळ येथे बुधवारी सायंकाळी वीज अंगावर पडून ज्योती बहीर (२२) ही महिला ठार झाली.
गेल्या २४ तासांत मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडला आहे.त्यात मध्य महाराष्ट्रात भोर, सिन्नर (२० मिमी), दहिवडी, जावली मेढा, खंडाळा-बावडा, निफाड, फलटण, शाहूवडी, वडगाव मावळ (१० मिमी), मराठवाड्यात कंधार (२० मिमी), हिंगोली, जाफराबाद, मुखेड, नांदेड (१० मिमी), विदर्भात मानोरा (४० मिमी), मंगरूळपीर, रिसोड (३० मिमी), बुलडाणा, लोणार (२० मिमी), दारव्हा, महागाव, उमरखेडला (१० मिमी) पावसाची नोंद झाली. दरम्यान, पुढील ४८ तासांत मुंबईत मेघगर्जनेसह पाऊस पडेल आणि उत्तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी गडगडाटी वावटळ येण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)
> पाऊस/गारपिटीचा अंदाज
३-४ मार्च : मुंबई, उत्तर मध्य महाराष्ट्र, कोकण, पुणे, गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या तुरळक भागात मेघगर्जनेसह पाऊस पडेल.
५ मार्च : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाच्या तुरळक भागात मेघगर्जनेसह पाऊस पडेल.
६ मार्च : मराठवाडा आणि विदर्भाच्या तुरळक भागात मेघगर्जनेसह पाऊस पडेल.
पाऊस/गारपिटीचा इशारा
३ मार्च : उत्तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या तुरळक भागात गारपीट होईल.
४ मार्च : उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकणी गारपीट होईल.