लोणावळा अपघातात चौघांचा मृत्यू
By admin | Published: September 11, 2016 03:52 AM2016-09-11T03:52:58+5:302016-09-11T03:52:58+5:30
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर मोटारीची कंटेनरला धडक बसून चार जण जागीच मृत्यूमुखी पडले. लोणावळ्यातील वलवण महाविद्यालयाजवळ शनिवारी मध्यरात्री
लोणावळा (पुणे ) : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर मोटारीची कंटेनरला धडक बसून चार जण जागीच मृत्यूमुखी पडले. लोणावळ्यातील वलवण महाविद्यालयाजवळ शनिवारी मध्यरात्री एकच्या सुमारास हा अपघात झाला.
मृतांमध्ये मुंबई काळाचौकीचे पोलीस हवालदार राजेंद्र विष्णू चव्हाण (वय ४७, मरोळ पोलीस मुख्यालय, बक्कल नं. ३२१८१), त्यांची पत्नी साक्षी उर्फ वनिता राजेंद्र चव्हाण (वय ४२, दोघेही रा. ४०३ मारुती अपार्टमेंट, दत्तपाडा, बोरीवली (पू.) मुंबई), शंकर मारोती वनगुले (वय ३३) व त्यांची पत्नी पूजा शंकर वनगुले (वय २६, दोघेही रा. सोनघर, ता. महाड, जि. रायगड) याचा समावेश आहे.
खंडाळा महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोटार मुंबईहून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगात येत होती. चालक राजेंद्र चव्हाण यांचे नियंत्रण सुटल्याने ती कंटेनरला मागून जोरात धडकली. ही धडक एवढी भीषण होती की, मोटार जवळपास ४ फूट कंटेनरच्या खाली घुसली. त्यामुळे मोटारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला. पनवेल विभागाचे महामार्ग पोलीस निरीक्षक अजित बारटक्के विशेष कारवाई मोहिमेची पाहणी करण्यासाठी जात असताना त्यांनी हा अपघात पाहिला. त्यांनी तातडीने खंडाळा महामार्ग पोलिसांना घटनास्थळी बोलावून मदतकार्य केले.
अपघाताबाबत संभ्रमावस्था
राजेंद्र चव्हाण हे गणपती उत्सवाकरिता त्यांच्या गावी दापोलीला गेले होते. शुक्रवारी गौरीपूजनानंतर सायंकाळी ६.३० वाजता ते सपत्नीक मुंबईला परत निघाले होते. ते एक्स्प्रेस हायवेवर लोणावळ्याकडे कसे आले? तसेच वनगुले दाम्पत्य त्यांच्या गाडीत कसे आले, याबाबत नातेवाईक, तसेच पोलीस अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम असून, त्याचा तपास सुरू असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
वाहनांचा अतिवेग जीवघेणा ठरत आहे. खबरदारी घेतल्यास हे मानवनिर्मित अपघात टाळता येऊ शकतात, असे मत महामार्ग पोलीस अधीक्षक अजित तांबे यांनी व्यक्त केले.
गणपतीचे दर्शन घेऊन निघालेल्या पोलिसासह पत्नीचा मृत्यू
गावच्या गणपतीचे दर्शन घेऊन मुंबईकडे बंदोबस्ताला हजर राहण्यासाठी निघालेल्या पोलिसाच्या कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात त्याच्यासह पत्नीचा मृत्यू झाल्याने पोलीस दलात शोककळा पसरली आहे. मुळचे दापोलीचे असलेले राजेंद्र विष्णू चव्हाण (४७) हे पत्नीसोबत बोरीवली दत्त पाडा येथे राहायचे. ते मरोळ मुख्यालयात पोलीस नाईक म्हणून कार्यरत होते. ते गणपतीसाठी गावी गेले होते. शनिवारी माऊंट मेरीच्या बंदोबस्तासाठी हजर राहण्यासाठी त्यांना फोन आला. ते पत्नी वनीतासोबत निघाले. वाटेतच त्यांनी शंकर मारुती वेणगुळे, पूजा वेणगुळे यांना लिफ्ट दिली. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर कंटेनरच्या धडकेत त्यांच्या कारचा अपघात झाला. ही धडक ऐवढी भिषण होती की सँट्रो गाडी जवळपास ४ फुट कंटेनरच्या खाली घुसल्याने आतमध्ये बसलेल्या चारही जणांचा जागीच मृत्यू झाला.