कल्याणच्या चार डॉक्टरांना ग्राहक मंचाने फटकारले
By admin | Published: April 7, 2017 03:21 AM2017-04-07T03:21:48+5:302017-04-07T03:21:48+5:30
कल्याण येथील ४ डॉक्टरांना जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने रूग्णाला ४ लाख नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
ठाणे : रूग्ण आणि त्याच्या बाळावर योग्य उपचारासाठी दिरंगाई करणाऱ्या कल्याण येथील ४ डॉक्टरांना जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने रूग्णाला ४ लाख नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. कृपेश मोरे यांच्या पत्नी विजया एप्रिल २०१० पासून प्रेगन्सीमधील उपचार श्री हॉस्पिटलमध्ये घेत होत्या. डिसेंबरमध्ये गर्भाशयातील जल कमी झाल्याचे आढळल्यावर त्यांना ३ इंजेक्शन घेण्यास सांगितले. दुसऱ्या इंजेक्शननंतर त्रास झाल्याचे डॉक्टरांना सांगितल्यावरही त्यांनी तिसरे इंजेक्शन घेण्याचे सुचविले. त्यानंतर त्यांना खूप ताप आला तरीही डॉक्टरांनी फोनवरूनच गोळी घेण्याचा सल्ला दिला. २ जानेवारीला त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. १०.३० वाजता सोनोग्राफी केल्यावर एलएससीएस आॅपरेशनचा निर्णय घेऊन २.३० वाजता करण्याचे ठरविले. प्रत्यक्षात ३.२५ वाजता केले. विजया यांनी बाळाला जन्म दिला. परंतु बाळाला श्वासोच्छवासाचा होणाऱ्या त्रासाबाबत मोरे यांना न सांगता बालरोगतज्ज्ञ आशिष पाटील निघून गेले. त्यानंतर आरएमओ डॉक्टरने बाळाची परिस्थिती सांगून त्याला यशोधन हॉस्पिटलमध्ये नेण्यास सांगितले. तेथील डॉ. इटकर हे नॅनोटोलॉजिस्ट नव्हते. त्यांनी दुसऱ्या नॅनोटोलॉजिस्टचा नंबर असूनही दिला नाही. मोरे यांनी स्वत: दुसऱ्या डॉक्टरांचा नंबर मिळविला. प्रकृती चिंताजनक असूनही ५ जानेवारीपर्यंत त्यांनी बाळाला स्वत:च्या हॉस्पिटलमध्ये ठेवले. १८ जानेवारीला बाळाचा मृत्यू झाला. नंतर मोरे यांनी डॉक्टरांना नोटीस पाठविली. मात्र त्यांनी योग्य उत्तरेही दिली नाही. अखेर ४ डॉक्टरांविरोधात मोरे यांनी मंचात तक्रार दाखल केली.
योगिता यांना होणाऱ्या इंफेक्शनमुळे दुसरी टेस्ट करण्याचा सल्ला मी दिला होता. तसेच मोरे यांनी मंचापासून अनेक बाबी लपवून ठेवल्या आहेत, असे सांगत डॉ.पराग पाटील यांनी तक्रार फेटाळण्याची मागणी केली. अनेक गुंतागुंतीचे मुद्दे आहेत. उलट तपासण्या कराव्या लागतील, त्यामुळे फेटाळावी असे डॉ.संजय गोडबोले यांनी सांगितले. मोरे आणि माझ्यात प्रिव्हिटी आॅफ कॉन्ट्रॅक्ट नाही, तक्रार फेटाळा असे डॉ. आशिष पाटील यांनी सांगितले. तर बाळाला व्हेंटीलेटरवर ठेवावे लागेल व जीवास धोका असल्याचे सांगितले होते. मात्र आमच्या इथेच उपचार चालू ठेवण्यास मोरेंनी सांगितल्याचा युक्तीवाद डॉ.आनंद इटकर यांनी केला.
कागदपत्र, पुरावे यांची तपासणी केली असता मोरे यांनी डॉ.पराग, संजय आणि आशिष यांना ४५ हजार दिले होते. तर योगिता गर्भवती असताना शेवटच्या महिन्यातील इंजेक्शननंतर त्यांना त्रास झाला. ही बाब डॉ.पराग यांना फोनवरून कळवूनही त्यांनी रूग्णालयात आणण्याचा सल्ला दिला नाही. योगिता यांचा त्रास डॉक्टरांना माहित होता. तरीही त्यांनी ट्रीटमेंट न बदलता तिसऱ्या इंजेक्शननंतरही गोळीचा सल्ला दिला. तसेच आॅपरेशनचा निर्णय तातडीने घेऊन प्रत्यक्षात ते उशिराने केले. एकंदरीतच योग्य निर्णय योग्यवेळी घेतले नाही. डॉ. आशिष यांनीही बाळाच्या परिस्थितीची कल्पना दिली नाही. तर डॉ.आनंद यांनी युक्तिवाद केला असला तरी त्याबाबत पुरावा दिला नाही. १८ जानेवारीला त्याचा मृत्यू झाल्याचा डेथ समरीमध्ये उल्लेख आहे. एकंदरीतच चारही डॉक्टरांनी मोरे यांच्या पत्नी व बाळाच्या उपचाराबाबत दिरंगाई करून सदोष सेवा दिल्याचे स्पष्ट होते. (प्रतिनिधी)
डॉक्टरांचा निष्काळजीपणा भोवला
कागदपत्र, पुरावे यांची तपासणी केली असता मोरे यांनी डॉ.पराग, संजय आणि आशिष यांना ४५ हजार दिले होते. तर योगिता गर्भवती असताना शेवटच्या महिन्यातील इंजेक्शननंतर त्यांना त्रास झाला. ही बाब डॉ.पराग यांना फोनवरून कळवूनही त्यांनी रूग्णालयात आणण्याचा सल्ला दिला नाही. योगिता यांचा त्रास डॉक्टरांना माहित होता. दुसऱ्या इंजेक्शननंतर त्यांना लाइन आॅफ ट्रीटमेंट बदलायला हवी होती. मात्र बदलली नाहीच. उलट तिसऱ्या इंजेक्शननंतरही गोळीचा सल्ला दिला. ही गंभीर आणि निष्काळजी बाब होती.