‘सूर ज्योत्स्ना’ पुरस्कारासह ‘लोकमत’कडून चार कार्यक्रम स्थगित; ‘कोरोना’मुळे घेतला निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 01:48 AM2020-03-13T01:48:57+5:302020-03-13T06:35:13+5:30
सामाजिक जबाबदारीतून उचलले पाऊल
नागपूर : जगभरात थैमान घालणाऱ्या ‘कोरोना’चा शिरकाव महाराष्ट्रातदेखील झाला आहे. या परिस्थितीत सामाजिक भान जपत ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाने राज्यातील विविध शहरांमध्ये आयोजित चार मोठे कार्यक्रम तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. यात नागपूर येथे आयोजित सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्काराचादेखील समावेश आहे, अशी माहिती ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाच्या ‘एडिटोरियल बोर्ड’चे चेअरमन विजय दर्डा यांनी दिली.
‘लोकमत’ वृत्तपत्र समूहातर्फे १४ मार्च रोजी ‘आयकॉन्स आॅफ कोल्हापूर’ या ‘कॉफीटेबल बुक’चे प्रकाशन आयोजित करण्यात आले होते. येथे ४०० हून अधिक मान्यवर व नागरिकांची उपस्थिती अपेक्षित होती. त्याच दिवशी सायंकाळी पुणे शहरात ‘लोकमत पुणे पोलीस अॅवॉर्ड’चे वितरण होणार होते. पोलिसांशी निगडित कार्यक्रम असल्याने यात तर १० हजारांची गर्दी होण्याची शक्यता होती.
२२ मार्च रोजी यवतमाळ येथे ‘लोकमत सखी मंच’च्या संस्थापक, संगीतसाधक व माझी धर्मपत्नी श्रीमती ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिदिवसाच्या पूर्वसंध्येला ‘स्वरांजली’ या संगीतमय श्रद्धांजली स्वरसंध्येचे आयोजन करण्यात आले होते. तर २३ मार्च रोजी ‘सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार’ या भव्य कार्यक्रमाचे नागपुरात आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला दरवर्षीप्रमाणे १० हजारांहून अधिक लोकांची उपस्थिती निश्चित मानली जात होती. हे सर्व कार्यक्रम तूर्तास स्थगित केल्याचे दर्डा यांनी सांगितले.
नागरिकांची सुरक्षा सर्वात महत्त्वाची
मुंबई, पुणे, नागपूरमध्ये ‘कोरोना’चे ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण आढळून आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर गर्दीच्या ठिकाणी जाणे नागरिकांनी टाळले पाहिजे. शिवाय जास्त नागरिक एकत्र होतील असे आयोजनदेखील स्थगित करावे किंवा पुढे ढकलावे, असे आवाहन राज्य शासनाने केले आहे. ‘लोकमत’ समाजाच्या सुखदु:खात नेहमीच सहभागी झाला आहे व वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी नागरिकांसमवेत उभा ठाकला आहे. राज्यातील नागरिक, आमचे मान्यवर पाहुणे, स्पर्धक , विजेते तसेच वक्ते व कलाकार यांची सुरक्षा व आरोग्य आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे. एक जबाबदार वृत्तपत्र म्हणून आम्ही हे सर्व कार्यक्रम तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘कोरोना’चा प्रभाव सरल्यानंतर आम्ही नवीन तारखांची घोषणा करू, असे विजय दर्डा यांनी स्पष्ट केले.