पोलिसांच्या घरांसाठी चार एफएसआय
By admin | Published: November 22, 2015 03:45 AM2015-11-22T03:45:59+5:302015-11-22T03:45:59+5:30
पोलिसांच्या घरांसाठी चार चटई क्षेत्र निर्देशांक देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असून, या निर्णयामुळे पोलिसांसाठी पुढील दोन वर्षांत १ लाख घरे बांधण्याचे
- दोन वर्षांत एक लाख घरे : पोलीस गृहनिर्माणासाठी खास निर्णय
मुंबई : पोलिसांच्या घरांसाठी चार चटई क्षेत्र निर्देशांक देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असून, या निर्णयामुळे पोलिसांसाठी पुढील दोन वर्षांत १ लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट साध्य होण्यास मदत होणार आहे.
राज्यातील पोलिसांसाठी सुमारे १ लाख २२ हजार ९५२ घरांची आवश्यकता आहे. गेल्या वर्षभरात राज्यात पोलिसांसाठी १५ हजार ५७९ घरे बांधण्यात आली. बृहन्मुंबई महापालिकेच्या धर्तीवर राज्यातील इतर महापालिका क्षेत्रातील विकास नियंत्रण नियमावलीमध्ये शासन, शासनाचे प्राधिकरण, पालिका यांच्या कर्मचाऱ्यांच्या घरांबद्दल नियम अंतर्भूत करण्यात आले आहेत. यानुसार या क्षेत्रातील भूखंडाचे क्षेत्र ४ हजार चौरस मीटर किंवा त्यापेक्षा जास्त असेल त्या ठिकाणी ४ चटई क्षेत्र देण्यात येणार आहे. (विशेष प्रतिनिधी)
वाणिज्यिक विक्री
खासगी विकासक किंवा जमीनमालक यांच्या जमिनीवर कर्मचारी निवासाचे बांधकाम करून देण्यास तयार असतील त्यांनाही प्रोत्साहनात्मक चटई क्षेत्र निर्देशांक दिला जाणार आहे. ही योजना किफायतशीर आणि व्यवहार्य व्हावी, यासाठी चटई क्षेत्र निर्देशांकाच्या एक-तृतीयांश चटई निर्देशांक वाणिज्यिक विक्री करावयाच्या सदनिकांसाठी मिळणार आहे.