लोकलच्या धडकेत चार गँगमन ठार

By admin | Published: February 20, 2016 03:31 AM2016-02-20T03:31:01+5:302016-02-20T03:31:01+5:30

रेल्वे ट्रॅक ओलांडू नका, ते धोक्याचे ठरू शकते, असे आवाहन करूनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना अपघातांना सामोरे जावे लागते. असाच प्रकार कुर्ला ते विद्याविहारदरम्यान घडला.

Four gangs killed in local train | लोकलच्या धडकेत चार गँगमन ठार

लोकलच्या धडकेत चार गँगमन ठार

Next

मुंबई : रेल्वे ट्रॅक ओलांडू नका, ते धोक्याचे ठरू शकते, असे आवाहन करूनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना अपघातांना सामोरे जावे लागते. असाच प्रकार कुर्ला ते विद्याविहारदरम्यान घडला. सकाळी साडेपाचच्या सुमारास विद्याविहारच्या दिशेने ट्रॅकवरून चालताना समोरून येणाऱ्या लोकलची धडक बसून रेल्वेचे चार कंत्राटी गँगमन ठार झाले.
नाना सावंत (२७), श्रवण वारे (१८), काशिनाथ बागे (१९) आणि गोकूळ पोकळे (१८) अशी मृतांची नावे आहेत. हार्बरच्या डॉकयार्ड रोड स्थानकातही १२ डबा लोकलचे काम सुरू आहे. गुरुवारी मध्यरात्री १ ते शुक्रवारी पहाटे ४पर्यंत ब्लॉक घेऊन ३0 कंत्राटी कामगार काम करीत होते. पहाटे ४पर्यंत काम पूर्ण होताच यातील नाना सावंत, श्रवण वारे, काशिनाथ बागे, गोकूळ पोकळे, विजय सोनावणे आणि दादू अडविले या कामगारांनी मेन लाइनवरील सॅण्डहर्स्ट रोड स्थानकात लोकल पकडून कुर्ला स्थानक गाठले. सकाळी कुर्ला प्लॅटफॉर्म क्र. १वर उतरल्यानंतर लोकल पुढे जाताच त्यांनी १ नंबर ट्रॅकवरून विद्याविहारच्या दिशेने चालण्यास सुरुवात केली. मात्र मागून येणाऱ्या लोकलच्या अंदाज येणार नसल्याने त्यांनी २ नंबर ट्रॅकवरून पुढे चालणे पसंत केले. हे सहाही जण एकामागोमाग चालत असतानाच यातील विजय सोनावणे आणि दादू अडविले मात्र अंतर ठेवून फार मागून चालत होते. त्याचवेळी गप्पा करत ट्रॅकवरुन चालत असतानाच समोरुन येणाऱ्या कर्जत-सीएसटी लोकलचा अंदाज सर्वात पुढे असणाऱ्या चारही कामगारांना आला नाही आणि लोकलची जोरदार धडक त्यांना बसली. समोरुन लोकल येत असल्याचा अंदाज आल्याने विजय सोनावणे आणि दादू अडविले हे त्वरीत बाजूला झाले आणि आपला जीव वाचविला. त्यानंतर याची त्वरीत माहीती त्यांनी रेल्वे पोलिसांना दिली आणि चारही कामगारांना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल केले असता त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. याबाबत कुर्ला रेल्वे स्थानकात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
......................

...चारही कामगार वाचले असते
यातील प्रत्यक्षदर्शी असलेले आणि चार कामगारांचे सहकारी असलेले कामगार विजय सोनावणे यांनी सांगितले की,डॉकयार्ड रेल्वे स्थानकात काम सुरु असून आमची सर्वांची विद्याविहार यार्डजवळ राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे दोन नंबर ट्रॅकवरुन चालून विद्याविहारजवळील यार्ड गाठतो. आम्ही सर्व जण चालत असतानाच येणाऱ्या लोकलची समोरची लाईट बंद झाली. तसेच हॉर्नही न वाजल्याने त्याचा अंदाज चारही जणांना आला नाही आणि हा अपघात झाला. मात्र आम्ही फार मागून चालत असल्याने आणि लोकल येत असल्याचा अंदाज आल्याने मोठमोठ्याने ओरडून त्याची माहीती देण्याचा प्रयत्न करत होतो. परंतु तेदेखिल फोल ठरले. नाहीतर चारही जण वाजले असते.
............
ठार झालेल्या चार कामगारांमध्ये नाना सावंत यांच्यामागे पत्नी, तीन मुले आहेत. तर काशिनाथ याचे आई वडील नसून आजीसोबत राहात असल्याचे सांगण्यात आले. श्रवण याचा भाऊदेखिल रेल्वे कामगार म्हणून मुंबईतच काम करतो. त्याचप्रमाणे गोकुळ याच्यामागे आईवडील आहेत.
..............................

नरेन्द्र पाटील (मध्य रेल्वे-मुख्य जनसंपर्क अधिकारी)
त्यांना देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीबाबत रेल्वे पोलिसांकडून अपघाताचा अहवाल मिळाल्यानंतरच पुढील निर्णय घेण्यात येईल. हे सर्व कंत्राटी कामगार होते.
..............................

Web Title: Four gangs killed in local train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.