बोहरा समाजाशी चार पिढ्यांचे नाते! अल्जामिया-तुस-सैफियाह शैक्षणिक संकुलाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2023 11:22 AM2023-02-11T11:22:17+5:302023-02-11T11:23:07+5:30
कोणत्याही समाज घटकातील विद्यार्थी शिक्षणात मागे पडू नये, यासाठी शिक्षण धोरणात बदल करून मातृभाषेतून शिक्षणाला प्राधान्य दिले जात आहे. डॉक्टर आणि इंजिनिअरिंगचे शिक्षणही मातृभाषेतून देण्याला सरकार प्राधान्य देईल, असे पंतप्रधान म्हणाले.
मुंबई : ‘‘मी तुमच्या कुटुंबातीलच एक सदस्य आहे. इथे मी मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान नाही. बोहरा समाजाशी चार पिढ्यांपासून मी जोडला गेलो आहे, हे माझे भाग्य आहे,’’ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी मुंबईतील बोहरा समाजाला साद घातली. अल्जामिया-तुस-सैफियाह शिक्षण संस्थेच्या कॅम्पसचे उद्घाटन करताना पंतप्रधान मोदी यांनी समाजाच्या धर्मगुरूंनी दीडशे वर्षांपूर्वी पाहिलेले स्वप्न पूर्ण झाले, असे गौरवोद्गार काढले.
अल्जामिया-तुस-सैफियाह संस्थेचे कुलगुरू डॉ. सय्यदन मुफद्दल सैफउद्दीन यांच्याकडून पंतप्रधानांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी पंतप्रधान म्हणाले, कोणताही समाज वेळेनुसार कसा बदलतो, यावरच त्या समाजाचा विकास अवलंबून असतो. या संस्थेची शाखा मुंबईत सुरू व्हावी, हे दीडशे वर्षांपासूनचे स्वप्न आज पूर्ण होत आहे. ‘दाउदी बोहरा’ हा उद्योग क्षेत्रात आघाडीवर आहे. या उद्योजकांसाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, दाउदी बोहरा समाजाचे शहजादा अलीअसगर कलीम ऊद्दीन, शहजादा कियदजोहर इज इज्जुद्दीन व मान्यवर उपस्थित होते.
मातृभाषेतून शिक्षणाला प्राधान्य
कोणत्याही समाज घटकातील विद्यार्थी शिक्षणात मागे पडू नये, यासाठी शिक्षण धोरणात बदल करून मातृभाषेतून शिक्षणाला प्राधान्य दिले जात आहे. डॉक्टर आणि इंजिनिअरिंगचे शिक्षणही मातृभाषेतून देण्याला सरकार प्राधान्य देईल, असे पंतप्रधान म्हणाले.
बोहरा समाजाकडून उत्साहात स्वागत
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांचा हा दुसरा मुंबई दौरा आहे. त्यात बोहरा समाजाच्या मुंबईतील कार्यक्रमाला उपस्थित राहात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपले नाते अधिक दृढ असल्याचे संकेत दिले आहेत.
विशेष म्हणजे बोहरा समाजाची मोठी वस्ती असलेल्या भागात ठिकठिकाणी समाजाच्या बँड पथकांनी मोदींचे उत्साहात स्वागत केले. मोदींना पाहण्यासाठी इमारतीच्या गॅलरी तसेच फुटपाथवर बोहरा नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्याचप्रमाणे गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून मोदींनी समाजाशी जोडलेल्या नात्याची चित्रफितच या कार्यक्रमात सादर करण्यात आली.