वसतिगृहातून चार तरुणी गायब
By admin | Published: April 28, 2015 01:27 AM2015-04-28T01:27:46+5:302015-04-28T01:27:46+5:30
औद्योगिक वसाहत भागातील ‘उज्ज्वला प्रकल्प’ या वसतिगृहामधून २२ ते ३० वयोगटातील चार तरुणी गायब झाल्यानंतर सोमवारी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे़
लातूर : औद्योगिक वसाहत भागातील ‘उज्ज्वला प्रकल्प’ या वसतिगृहामधून २२ ते ३० वयोगटातील चार तरुणी गायब झाल्यानंतर सोमवारी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे़
एमआयडीसीतील ए-४५ जागेत ‘उज्ज्वला प्रकल्प’ हे ५० जागा क्षमतेचे महिलांसाठीचे वसतिगृह मागास जनसेवा समितीद्वारे चालविले जाते़ यात सध्या ४० मुलींचे वास्तव्य असून, त्यापैकी ४ मुली २६ एप्रिलच्या पहाटेपासून बेपत्ता आहेत़ या वसतिगृहातील स्वच्छतागृह व स्नानगृहाची खिडकी उचकटून बाहेरील पत्र्यांवर उतरून त्या चौघी पसार झाल्याची तक्रार वसतिगृहाच्या महिला समुपदेशिकेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली आहे़ वसतिगृहाचे दोन कर्मचारी एमआयडीसी पोलिसांत रविवारी दुपारी तक्रार देण्यासाठी आले असता, त्यांना मुलींचे फोटो घेऊन या म्हणून परत पाठविण्यात आले होते़ त्यामुळे रविवारी तक्रार दाखल झालेली नव्हती़ सोमवारी परिपूर्ण माहितीनंतर चारही तरुणी बेपत्ता झाल्याची नोंद एमआयडीसी पोलिसांनी केली आहे़
घटनेबाबत पोलिसांकडे तक्रार देण्यात आली असल्याचे वसतिगृहाचे महेश बदामे यांनी सांगितले़ त्यापैकी दोघी जणी बीड येथील न्यायालयाच्या आदेशानुसार तर दोघी जणी लातूरच्या न्यायालयाच्या आदेशानुसार आल्या होत्या, असेही ते म्हणाले़ (प्रतिनिधी)