उद्याने आणि मोकळ््या जागांवर ‘फोर-जी’टॉवर !
By admin | Published: November 7, 2015 01:15 AM2015-11-07T01:15:03+5:302015-11-07T01:15:03+5:30
मुंबईतील उद्याने आणि मोकळ्या जागांवर ‘फोर-जी’ टॉवर्स उभारण्याचा रिलायन्सचा मार्ग मोकळा झाला आहे. रिलायन्स ‘फोर-जी’ टॉवर्सच्या मंजुरीच्या फेरविचारणीची काँँग्रेसकडून
मुंबई : मुंबईतील उद्याने आणि मोकळ्या जागांवर ‘फोर-जी’ टॉवर्स उभारण्याचा रिलायन्सचा मार्ग मोकळा झाला आहे. रिलायन्स ‘फोर-जी’ टॉवर्सच्या मंजुरीच्या फेरविचारणीची काँँग्रेसकडून करण्यात आलेली मागणी महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजपाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे येथे तब्बल ४७५ टॉवर्स उभारण्यात येणार आहेत.
मुंबई शहर आणि उपनगरांत ‘टू-जी’ आणि ‘थ्री-जी’ मोबाइल टॉवर्सहून वादळ उभे राहिले असतानाच आता रिलायन्सच्या ‘फोर-जी’ टॉवर्सचा मार्ग मोकळा झाल्याने वादात आणखी ठिणगी पडली आहे. या पूर्वीही चेंबूर आणि शिवडी येथे उभारण्यात येत असलेल्या ‘फोर-जी’ टॉवर्सचा मुद्दा पेटला होता. आणि यावर चेंबूरसह शिवडीमधील नागरिकांनी आक्षेप घेत आंदोलने हाती घेतली होती. आंदोलनाला राजकीय पाठबळ मिळाल्याने नागरिकांनाही हायसे वाटले होते. परंतु आता रिलायन्सच्या ‘फोर-जी’ टॉवर्सच्या फेरविचाराची काँग्रेसची मागणी शिवसेना-भाजपाने फेटाळून लावल्याने हा मुद्दा पुन्हा एकदा पेटणार आहे.
मोबाइल टॉवर्समुळे होत असलेल्या रेडिएशनमुळे आरोग्यावर दुष्परिणाम होत असल्याचा दावा करीत त्यावर कायमच आक्षेप घेण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
मुंबईत १,१०६ मोकळ्या भूखंडांवर मोबाइल टॉवर उभारण्यात येणार आहेत. याचा फटका माटुंगा, चेंबूर, सायन, भांडुप, घाटकोपर, मुलुंड येथील नागरिकांना बसणार आहे.