सोलापूर, उस्मानाबादच्या साखर कारखान्यांकडे चारशे कोटी थकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 12:33 PM2019-08-01T12:33:16+5:302019-08-01T12:34:56+5:30
८२५ कोटी देणे; साखर हंगाम बंद होऊन पाच महिने उलटले एफआरपी मिळेना
सोलापूर : राज्यातील ७५ साखर कारखान्यांकडे एफआरपीप्रमाणे ८२५ कोटी ७५ हजार रुपये थकबाकी असून, यापैकी सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील कारखान्यांकडे ३९५ कोटी २८ लाख रुपये अडकले आहेत. साखर कारखाने बंद होऊन पाच महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला तरीही शेतकºयांच्या उसाचे पैसे मात्र मिळाले नाहीत.
राज्यातील १९५ साखर कारखान्यांनी मागील वर्षी गाळप हंगाम घेतला होता. या कारखान्यांनी गाळप केलेल्या उसाचे एफआरपीनुसार २३ हजार १७३ कोटी रुपये शेतकºयांचे देणे आहेत. यापैकी २२ हजार ३६७ कोटी रुपये दिले असून १५ जुलैपर्यंत ८२६ कोटी रुपये शेतकºयांचे देणे आहे. १२० साखर कारखान्यांनी शासनाच्या नियमाप्रमाणे एफआरपी दिली असून ७५कारखान्यांकडे शेतकºयांच्या उसाचे पैसे देणे आहे. ८० टक्क्यांपेक्षा अधिक एफआरपी ५६ कारखान्यांनी दिली असून, १४ कारखान्यांनी ६० टक्क्यांपेक्षा अधिक रक्कम दिली आहे. पाच कारखान्यांनी ६० टक्क्यांपर्यंत रक्कम दिली आहे.
राज्यातील कारखान्यांनी शेतकºयांचे ८२५ कोटी थकविले आहेत त्यात सोलापूर जिल्ह्यात ३१२ कोटी ९२ लाख तर उस्मानाबाद जिल्ह्यात ८२ कोटी ३७ लाख रुपये थकबाकी आहे. हंगाम संपल्याने कारखाने बंद होऊन पाच महिन्यांचा कालावधी लोटला आहे; मात्र शेतकºयांना उसाचे पैसे मिळत नाहीत. काही कारखान्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक रक्कम दिली असून, केंद्र व राज्य शासनाकडून येणारी रक्कम थकल्याने संपूर्ण एफआरपी देऊ शकत नसल्याचे सांगितले जाते.
साखरेला उठाव नसल्याने एफआरपी थकली आहे. शासनानेच शेतकºयांचे पैसे देण्यास सवलत दिली आहे. मागील १५ दिवसात काही रक्कम शेतकºयांना दिली आहे. एफआरपीच्या दोन टक्के रक्कम देणे आहे. ती कारखान्याकडून शेतकºयांना देण्यासाठी आमचा प्रयत्न आहे.
- शेखर गायकवाड, साखर आयुक्त, पुणे