एकाला वाचवताना गेला चौघांचा जीव; रशियात महाराष्ट्रातील चार विद्यार्थ्यांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2024 07:06 PM2024-06-07T19:06:31+5:302024-06-07T19:07:57+5:30
महाराष्ट्रातील चार विद्यार्थ्यांचा रशियाच बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
रशियात भारतातील चार विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रशियातील सेंट पीटर्सबर्गजवळील एका नदीत चार भारतीय विद्यार्थी बुडाले. तिथल्या प्रशासनाने एक मृतदेह बाहेर काढला असून उर्वरित तिघांचा शोध सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे चारही विद्यार्थी महाराष्ट्रातील होते आणि वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी तिथे गेले होते. मात्र चौघांच्याही मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
जळगावमधील चार विद्यार्थी रशियामधील यारोस्लाव-द-वाईज नोव्हगोरोड स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेले होते. मात्र मंगळावीर तिथे घडलेल्या एका अपघातात चौघांचाही बुडून मृत्यू झाला. मृतांपैकी एकाचा मृतदेह सापडला असून तिघांच्या मृतदेहांचा शोध सुरु आहे. चौघेही जळगाव जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला.
जिया फिरोज पिंजारी, जीशान अशपाक पिंजारी, गुलामगज मोहम्मद याकूब मलिक आणि हर्षल अनंतराव देसले असे मृत्यू झालेल्या चौघांची नावे आहेत. तर
निशा भूपेश सोनवणे हिला वाचवण्यात यश आलं आहे. चौघांपैकी हर्षल देसले या विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला असून इतर तिघे विद्यार्थी अद्याप बेपत्ता असल्याची माहिती जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. जिया आणि जिशान हे अमळनेर येथील रहिवासी होते. तर गुलामगज मोहम्मद याकूब यावल तर हर्षल भडगाव येथील रहिवासी होता.
सेंट पीटर्सबर्गच्या जवळील एका नदीच्या काठावर हे सर्व विद्यार्थी ४ जून रोजी संध्याकाळच्या सुमारास फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी एकजण नदीमध्ये उतरला होता. तो बुडायला लागल्याने इतर मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र या घटनेमध्ये चौघांचाही बुडून मृत्यू झाला. तर निशा सोनवणे हिला वाचवण्यात यश आल्याची माहिती भारतीय दूतावासाच्या माध्यमातून रशियन अधिकाऱ्यांनी दिली.
"वोल्खोव्ह नदीच्या किनारी, संध्याकाळी हे विद्यार्थी फेरफटका मारत होते. ही दुर्घटना अपघाती आणि अनपेक्षित होती. यामध्ये निशा भूपेश सोनवणे बचावली आहे. आता ती वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली आहे," अशी माहिती विद्यापीठाच्या एका अधिकाऱ्याने दिली. दुसरीकडे रशियामधील भारतीय दूतावास आणि सेंट पीटर्सबर्गमधील वाणिज्य दूतावास तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी आणि शक्य तितक्या लवकर भारतात परत आणण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांसोबत प्रयत्न करत आहेत.
दरम्यान, वैद्यकीय पदवी शिक्षण मिळवण्यात भारतीय विद्यार्थ्यांसाठी रशिया हे लोकप्रिय ठिकाण बनले आहे. रशियात वैद्यकीय शिक्षणामध्ये उत्कृष्टतेचा मोठा इतिहास आहे. रशियामधील शिक्षण शुल्क आणि राहण्याचा खर्च खाजगी भारतीय महाविद्यालये किंवा तत्सम दर्जा असलेल्या इतर देशांपेक्षा लक्षणीयरीत्या कमी आहेत.