महाराष्ट्रातील चार जवानांना वीरमरण

By admin | Published: September 20, 2016 06:11 AM2016-09-20T06:11:09+5:302016-09-20T06:11:09+5:30

शहीद झालेल्या १८ जवानांपैकी चार महाराष्ट्रातील असून, त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १५ लाखांची मदत सरकार करणार

The four jawans of Maharashtra, Veerramaran | महाराष्ट्रातील चार जवानांना वीरमरण

महाराष्ट्रातील चार जवानांना वीरमरण

Next


मुंबई/नवी दिल्ली : काश्मीरमधील उरी येथील लष्करी तळावर रविवारी करण्यात आलेल्या अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या १८ जवानांपैकी चार महाराष्ट्रातील असून, त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १५ लाखांची मदत देण्याचे तसेच त्यांच्यावर गावी शासकीय इतमातात मंगळवारी अंत्यसंस्कार करण्याचे राज्य सरकारने सोमवारी जाहीर केले. हे चारही जवान लष्करात ६ बिहार रेजिमेंटमध्ये होते.
शहीद झालेल्या जवानांमध्ये अमरावतीचे विकास जानराव उईके (२७), यवतमाळचे विकास जनार्दन कुडमेथे (३१), नाशिकचे संदीप सोमनाथ ठोक (२५) व साताऱ्याचे चंद्रकांत शंकर गलंंडे (२९) यांचा समावेश आहे. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वरचे विकास उईके हे २००९मध्ये सैन्यात दाखल झाले होते. त्यांचे वडील जानराव उईके हेसुद्धा ३४ वर्षे सैन्यदलात होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, बहीण आहेत. ६ सप्टेंबरला कुटुंबीयांशी दूरध्वनीवरून केलेली चर्चा हाच त्यांचा शेवटचा संवाद ठरला.
यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील पुरड गावातील विकास कुडमेथे २००८मध्ये लष्करात भरती झाले होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगी आहेत. त्यांची दहा महिन्यांची मुलगी जिज्ञासा ही सध्या आजारी आहे.
नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील खडांगळी गावचे जवान संदीप ठोक हे २०१४मध्ये भरती झाले होते. त्यांच्या पश्चात आजी, आई-वडील, भाऊ, वहिणी, दोन बहिणी असा परिवार आहे. सोमवारी रात्री त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले.
सातारा जिल्ह्यातील जाशी (ता. माण) येथील शहीद जवान चंद्रकांत गलंडे यांचे कुटुंब शेती करते. चंद्रकांत यांचा मोठा भाऊ मंज्याबापू आणि लहान भाऊ केशव हेसुद्धा सैन्यात आहेत. त्यांच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
>तीन शहीद जवानांचे पार्थिव आणले
जम्मू-काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये रविवारी केलेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या महाराष्ट्रातील तीन जवानांचे पार्थिव हवाई दलाच्या खास विमानाने सोमवारी रात्री पुण्याला आणण्यात आले. तेथून ते मूळ गावी पाठवण्यात येणार असून, मंगळवारी त्यांच्यावर सरकारी इतमातात अंत्यसंस्कार करण्यात येतील.
नाशिकमध्ये अंत्यसंस्कार
संदीप ठोक यांच्या पार्थिवावर सोमवारी रात्री खडांगळी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. त्यांचा विवाह करण्याचा कुटुंबीयांचा विचार होता. २८ सप्टेंबरला ते सुटीवर येणार होते. त्या वेळी मुलगी पाहण्यास जाणार होते.
>पाकच्या उलट्या बोंबा : काश्मीरची दहशतवादी राज्य म्हणून झालेली ओळख लपविण्यासाठीच भारताकडून जगाची दिशाभूल सुरू आहे, अशी उलटी बोंब मारायला पाकिस्तानने सुरुवात केली आहे. उरी हल्ल्यानंतरच्या भारताच्या कडवट आणि निराधार आरोपातून हेच सिद्ध होते, असा जावईशोधही पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे विदेश विभागाचे सल्लागार सरताज अजीज यांनी लावला. भारताच्या आक्रमकतेमुळे आमच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाल्यास आम्ही अण्वस्त्रांचा वापर करण्यास मागेपुढे पाहणार नाही, अशी धमकी पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा असीफ यांनी सोमवारी दिली.

Web Title: The four jawans of Maharashtra, Veerramaran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.