नदीपात्रात चार अल्पवयीन मुलं बुडाली
By Admin | Published: May 27, 2017 01:39 PM2017-05-27T13:39:24+5:302017-05-27T13:58:45+5:30
नाशिकमधील पळसे शिवारात दारणा नदीच्या पात्रात पोहोण्यासाठी गेलेल्या चार मित्रांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. यातील दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 27 - नाशिकमधील पळसे शिवारात दारणा नदीच्या पात्रात पोहोण्यासाठी गेलेल्या चार मित्रांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते नदीत बुडाले आगेत. हे चारही जण अल्पवयीन असल्याची माहिती आहे. चार जणांपैकी दोघांचा मृतदेह अग्निशमन दलाच्या सापडले आहेत. अन्य दोन जणांचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पळसे स्मशानभूमीजवळ दारणा नदीपात्रात पोहोण्यासाठी दारणा संकुलामधील चार मित्र शुक्रवारी दुपारी गेले होते. या चार जणांना नदीपात्रात उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज आला नाही, त्यामुळे गटांगळ्या खाऊन चौघेही बुडाले.
शनिवारी सकाळी नदीकाठालगत त्यांचे कपडे आढळून आल्यानंतर चौघेही नदीत बुडाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. स्थानिकांनी याबाबतची माहिती अग्निशमन दलाला तातडीनं कळवली. दरम्यान, काही वेळेतच जवानांनी बोटीच्या सहाय्याने नदीपात्रात बुडालेल्या मुलांचा शोध घेण्यास सुरूवात केली.
यावेळी दोन मुलांचा मृतदेह जवानांनी नदीपात्रातून बाहेर काढले. सुमीत राजेंद्र भालेराव (१५), कल्पेश शरद माळी (१४) असे मृतांची नावं आहेत. उर्वरित दोघांचा नदीपात्रात जवानांकडून शोध घेतला जात आहे. रोहित आधार निकम, गणेश रमेश डहाळे ही दोन मुले अद्याप बेपत्ता आहेत.