अस्वलाच्या हल्ल्यात चार ठार, दोन गंभीर जखमी
By admin | Published: May 13, 2017 04:40 PM2017-05-13T16:40:51+5:302017-05-13T18:21:20+5:30
जिल्ह्यातील खरताडा जंगलात सहाजणांवर हल्ला करणा-या अस्वलाला पोलीस आणि वनविभागाने गोळया झाडून ठार मारले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
चंद्रपूर, दि. 13 - ब्रह्मपुरी वनविभागांतर्गत नागभीड तालुक्यातील तळोधी(बा.) वनपरिक्षेत्रांत कक्ष क्र ९५ आलेवाही- किटाळी जंगलात अस्वलाने केलेल्या हल्ल्यात तीन जण ठार झाले. यामध्ये एक महिला व दोन पुरुषाचा समावेश आहे, तर एक महिला व दोन युवक गंभीर जखमी आहे. दोघांना नागपूर येथे हलविण्यात आले आहे. एकावर चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. हा थरार शनिवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडला.
या घटनेने संतप्त झालेल्या गावकऱ्यांच्या दबावानंतर वनविभागाने गोळ्या घालून अस्वलाला ठार केले. मृतकामध्ये रंजना अंबादास राउत(६०) व बिसन सोमा कुलमेथे(४०) रा. किटाळी आणि फारुख युसुफ शेख(३२) रा. खरकाडा यांचा समावेश आहे. जखमींमध्ये मीना दुधाराम राऊत(४५), सचिन बिसन कुलमेथे व कुणाल दुधाराम राऊत यांचा समावेश आहे.
रंजना राऊत यांचा घटनास्थळी मृत्यू झाला, तर बिसन कुलमेथे व फारुख शेख यांचा मृत्यू सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात मृत्यू झाला.
किटाळीतील पाच जण व खरकाडा येथील एक जण नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी तेंदूपत्ता संकलनासाठी आलेवाही- किटाळी जंगलात गेले होते. सर्वजण तेंदूपत्ता संकलनात व्यस्त असताना अचानक एका अस्वलाने सर्वप्रथम रंजना राऊत यांच्यावर हल्ला चढविला. तिला वाचविण्यासाठी कुणाल राऊत अस्वलावर धावून गेला. त्यावेळी अस्वलाने त्यालाही कवेत घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा कुणाल झाडावर चढला. मात्र झाड लहान असल्याने ते खाली वाकले. अस्वलाने उडी घेऊन त्याच्या पायाचा लचका तोडला. त्यामुळे त्याची आई मीना राऊत धावून गेली.
अस्वलाने तिलाही गंभीर जखमी केले. तेव्हा बिसन कुलमेथे, सचिन कुलमेथे व फारुख शेख यांनी अस्वलाला पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही गंभीर जखमी केले. त्या अवस्थेतही त्यांनी अस्वलाशी कडवी झुंज दिली. ही घटना माहिती पडताच आलेवाही खरकाडा, किटाळी येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील गावांमधील नागरिकही धावून आले. त्यांनी पोलीस व वनविभागाला याची माहिती दिली. अस्वालाच्या हल्ल्याचे दृश्य पाहून जमाव संतप्त झाला.
तेव्हा काही वेळानंतर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहचले. त्यांना जमावाच्या संतापाला तोंड द्यावे लागले. पोलीस दुपारी १ वाजता पोहोचली. यामुळे जमाव पुन्हा भडकला. लोकांचा रोष पाहून वनभिगाच्या पथकाने अस्वलाला गोळ्या घालून ठार केले. घटनास्थळी पंचक्रोशीतील दोन हजारांवर लोक जमले होते.
घटनेची माहिती मिळताच काँग्रेसचे उपनेते आ.विजय वडेट्टीवार, नागभीड पं स सभापती प्रफुल्ल खापर्डे, जि प सदस्य कोजराम मरस्कोले, पं स सदस्य ठाणेश्वर कायरकर यांनी घटनास्थळी भेट दिली. उपविभागीय अधिकारी उमेश काळे सकाळपासूनच दाखल झाले होते. त्यांनी व ठाणेदार ओ बी अंबाडकर यांनी जखमींना तातडीने सिंदेवाही व चंद्रपूरला हलविले. वनविभागाने मृतक व जखमीच्या कुटुंबियांना मदत देणार असल्याचे दक्षिण वनपरिक्षेत्र अधिकारी सुभाष नायगमकर यांनी सांगितले.