अकोल्यात सव्वा चार लाखांची रोकड जप्त
By admin | Published: October 13, 2014 05:24 AM2014-10-13T05:24:54+5:302014-10-13T05:24:54+5:30
कृषी विद्यापीठासमोरील जकात नाक्यावर निवडणूक विभागाच्या पथकाने रविवारी सायंकाळी ४ च्या सुमारास एका पेट्रोलपंप मालकाच्या कारमधून ४ लाख २७ हजार ५०० रुपयांची रोकड जप्त केली
अकोला : कृषी विद्यापीठासमोरील जकात नाक्यावर निवडणूक विभागाच्या पथकाने रविवारी सायंकाळी ४ च्या सुमारास एका पेट्रोलपंप मालकाच्या कारमधून ४ लाख २७ हजार ५०० रुपयांची रोकड जप्त केली; परंतु ही रोख पेट्रोल विक्रीची असल्याचे स्पष्ट झाले. ही रोकड सिव्हिल लाईन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहे.
नरेश अग्रवाल यांचा शिवणी येथे पेट्रोलपंप असून, रविवारी दुपारी ते पेट्रोलपंपावर गोळा झालेली ४ लाख २७ हजार ५०० रुपयांची रोख घेऊन इंडिकाने घराकडे येत होते. दरम्यान, त्यांची कार निवडणूक विभागाच्या पथकाने जकात नाक्यावर अडविली. कारची तपासणी केली असता रोकड मिळून आली.
अग्रवाल यांनी ही रोख पेट्रोल विक्रीची असून, त्याचा हिशेबही पेट्रोलपंपावर असल्याचे सांगितले; परंतु त्यांचे म्हणणे ऐकून न घेता त्यांना थेट सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यात आणले आणि ही रोकड निवडणूकसंबंधी आणली असल्याच्या संशयावरून ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही रक्कम पोलिसांनी ताब्यात घेतली असून, सोमवारी पेट्रोल विक्रीचा हिशेबाची कागदपत्रे दिल्यानंतर रोख त्यांना परत देण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)