पिस्तूलसह चार जिवंत काडतूस जप्त
By admin | Published: January 8, 2016 02:16 AM2016-01-08T02:16:31+5:302016-01-08T02:16:31+5:30
शेगावातील दोन युवक गजाआड, आकोट फैल पोलिसांची कारवाई.
अकोला: शेगावहून अकोल्यातील आकोट फैल भागामध्ये विदेशी बनावटच्या पिस्तूलसह चार जिवंत काडतूस विक्रीसाठी आणणार्या दोन युवकांना आकोट फैल पोलिसांनी गुरुवारी मोठय़ा शिताफीने अटक केली. त्यांच्याकडून पिस्तुलसह काडतूस पोलिसांनी जप्त केले असून, ते ज्या ऑटोरिक्षाने अकोल्यात आले होते, ती ऑटोरिक्षाही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांना १0 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. शेगाव येथील पंचशीलनगरमधील रहिवासी सुदर्शन ऊर्फ गोलू गोपाल उकर्डे (२२) व राहुल शिवाजी शिरसाट (३0) हे दोघे एमएच ३८-३९८६ क्रमांकाच्या ऑटोरिक्षाने शेगावहून अकोल्यात येत होते. त्यांच्याकडे पिस्तूल व चार जिवंत काडतूस असल्याची माहिती आकोट फैल पोलिसांना बुधवारी सायंकाळी मिळाली. या माहितीच्या आधारे आकोट फैल पोलिसांनी शेगाव ते अकोला मार्गावर पाळत ठेवली. ते दोघेही ऑटोरिक्षाने आकोट फैल परिसरात असलेल्या रेल्वे उड्डाणपुलावर येताच पोलिसांनी वाहन अडवून दोन्ही युवकांची झडती घेतली. यावेळी एका युवकाजवळ तब्बल ७00 ते ९00 ग्रॅम वजन असलेले पिस्तूल व दुसर्या युवकाजवळ चार जिवंत काडतूस आढळून आले. ते ज्या ऑटोरिक्षाने अकोल्यात दाखल झाले, ती ऑटोरिक्षाही पोलिसांनी जप्त केली आहे. नवीन वर्षात पिस्तूल जप्तीची ही पहिली कारवाई असून, अकोला पोलिसांनी यापूर्वीही देशी व विदेशी बनावटीचे पिस्तूल जप्त केले आहेत. याप्रकरणी दोन्ही युवकांविरुद्ध आकोट फैल पोलीस ठाण्यात आर्म्र्स अँक्टच्या कलम ३, २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही युवकांना अटक करून त्यांना दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांना १0 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. ही कारवाई पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, शहर पोलीस उपअधीक्षक पी.एम. चव्हाण यांच्या मार्गदर्शनात सहायक निरीक्षक शिरीष खंडारे, उपनिरीक्षक डी. एस. शिंपी, दिनकर गुडदे, सुरेश वाघ, अश्विन शिरसाट, मनोज नागमते, अमर इंगळे, रवि घिवे, ज्ञानेश्वर लांडे, गजानन जंजाळ यांनी केली.