मराठवाड्यात चार; तर विदर्भात दोन आत्महत्या
By admin | Published: April 5, 2016 02:20 AM2016-04-05T02:20:36+5:302016-04-05T02:20:36+5:30
सततची नापिकी आणि कर्जामुळे जालना तीन, औरंगाबाद जिल्ह्यातील एक आणि बुलढाणा जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यााचे सोमवारी समोर आले.
औरंगाबाद /जालना/बुलडाणा : सततची नापिकी आणि कर्जामुळे जालना तीन, औरंगाबाद जिल्ह्यातील एक आणि बुलढाणा जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यााचे सोमवारी समोर आले.
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील बाभूळगाव येथील समाधान (पप्पू) राऊत (२६) याने रविवारी सायंकाळी शेतातील विहिरीतील लोखंडी गर्डरला गळफास घेऊन आत्महत्या केली. तर याच तालुक्यातील वरूड बु. येथील सुरेश किसन गिरी (४५) यांनी सोमवारी शेतातील घरात गळफास घेऊन जीवन संपविले. तिसरी घटना जालना शहरात सोमवारी दुपारी रेल्वे उड्डाणपुलाखाली घडली. अंबड तालुक्यातील बनटाकळी येथील रहिवासी बबन भानुदास भडांगे यांनी या पुलाखाली विषारी द्रव सेवन केले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. भडांगे यांच्यावर ५० हजार रूपयांचे ग्रामीण बँकेचे कर्ज होते, असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.
औरंगाबाद तालुक्यातील शेवगा येथील अजिनाथ कोरडे (२६) या शेतकऱ्याने गुरुवारी दुपारी शेतात विष घेतले होते. घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना आज त्याचा मृत्यू झाला. कोरडे यांना पंधरा दिवसांपूर्वीच मुलगा झाला होता. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात दोन कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. माटरगाव येथील बंडू किसन मालठाणे (४५) यांनी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. मोमिनाबाद येथील सुधाकर राजाराम कळमकार (३५) यांनी रविवारी सायंकाळी शेतातच विष घेतले होते.