चार बाजार समित्या बरखास्त
By admin | Published: November 11, 2014 10:54 PM2014-11-11T22:54:53+5:302014-11-11T23:18:12+5:30
प्रशासक नियुक्त : तासगाव, पलूस, विटा, आटपाडीचा समावेश
सांगली/तासगाव/आटपाडी/विटा : सहकार विभागाने दिलेल्या आदेशाने सांगली जिल्ह्यातील तासगाव, पलूस, विटा-खानापूर आणि आटपाडी या चार कृषी उत्पन्न बाजार समित्या मंगळवारी बरखास्त करण्यात आल्या. जिल्ह्यातील चार सहाय्यक निबंधकांनी प्रशासक म्हणून या समित्यांचा कार्यभार हाती घेतला असून, पुढील आदेश येईपर्यंत आता प्रशासकांच्याच हाती समित्यांचा कारभार राहणार आहे.
शेतकऱ्यांच्या पिळवणुकीचे केंद्र व राजकारणाचा अड्डा बनलेल्या या समित्यांना सहकार विभागाने दणका दिला आहे. जिल्ह्यातील चार बाजार समित्या बरखास्त करण्याचे आदेश मंगळवारी जिल्हा उपनिबंधकांना प्राप्त झाले. त्यानुसार चारही बाजार समित्या तातडीने बरखास्त करून त्याठिकाणची सूत्रे प्रशासकांच्या हाती सोपविण्यात आली आहेत. या चारही बाजार समित्यांची मुदत यापूर्वीच संपली आहे. यातील मंडळांना वारंवार मुदतवाढ देण्यात आली होती. चारही बाजार समित्यांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले आहे. तासगावमध्ये राष्ट्रवादीचे, विटा-खानापूरमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचे संयुक्त, पलूस समितीत काँग्रेसचे, तर आटपाडी समितीत राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. चारही बाजार समित्यांमधील वार्षिक उलाढाल पाचशे कोटींच्या घरात आहे. त्यामुळे सहकार विभागाच्या या निर्णयाने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
बरखास्त झालेल्या चार समित्यांमध्ये सर्वात मोठी समिती म्हणून तासगावचा उल्लेख होतो. याठिकाणी वार्षिक सव्वाचारशे कोटी रुपयांची उलाढाल होते. ज्यावेळी या बाजार समितीची निवडणूक झाली होती, त्यावेळी याठिकाणी माजी मंत्री आर. आर. पाटील आणि खासदार संजय पाटील एकत्रच राष्ट्रवादीत होते. त्यामुळे या बाजार समितीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. एकूण २१ जणांचे मंडळ अस्तित्वात होते. त्यातील दोन स्वीकृत सदस्य होते. निवडून आलेल्यांमध्ये आर. आर. पाटील गटाचे १३, तर संजय पाटील गटाचे ६ सदस्य समितीवर होते. तासगाव समितीची मुदत १ मे २0१३ ला संपली असताना, त्यानंतर १८ महिने सातत्याने मंडळाला मुदतवाढ मिळाली. (प्रतिनिधी)
सहकार विभागाच्या आदेशाची तातडीने अंमलबजावणी
जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने संबंधित बाजार समित्यांवर सहकार विभागाच्या आदेशानुसार प्रशासक नियुक्ती केली आहे. पुढील आदेश येईपर्यंत याठिकाणी प्र्रशासकांमार्फत कारभार पाहिला जाईल, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक डॉ. एस. एन. जाधव यांनी दिली.
आता प्रशासकराज
बाजार समित्या बरखास्तीनंतर तासगावसाठी सहा. निबंधक शंकर पाटील, पलूससाठी श्रीमती पी. बी. कोळेकर, विटा-खानापूर अमोल डफळे, तर आटपाडीसाठी विजया बाबर यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे.
बाजार समित्यांची उलाढाल
समित्या उलाढाल वर्चस्व
तासगााव ४२५ कोटी राष्ट्रवादी
खानापूर१.५ कोटी कॉँग्रेस-राष्ट्रवादी
पलूस ६0 लाख कॉँग्रेस
आटपाडी २५ कोटी राष्ट्रवादी