म्हात्रे हत्येप्रकरणी आणखी चौघे अटकेत
By admin | Published: March 3, 2017 05:50 AM2017-03-03T05:50:46+5:302017-03-03T05:50:46+5:30
ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी पथकाने आणखी चौघांना अटक केल्याने या प्रकरणी कथित आरोपींची संख्या सात झाली आहे.
ठाणे : भिवंडी महापालिकेतील काँग्रेस गटनेते मनोज म्हात्रे यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी पथकाने आणखी चौघांना अटक केल्याने या प्रकरणी कथित आरोपींची संख्या सात झाली आहे. त्या चौघांना न्यायालयाने १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या चौकडीचा म्हात्रेंच्या हत्येत सहभाग असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, त्यामध्ये चॉपरने हल्ला करणाऱ्याचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
फेब्रुवारीत ठाणे महापालिका निवडणुकीचे पडघम सुरू असताना भिवंडीत म्हात्रे यांची रात्रीच्या सुमारास हल्लेखोऱ्यांनी गोळ्या झाडून आणि चॉपरने वार करून निर्घृण हत्या केली होती. ही हत्या त्यांच्या पुतण्याने केल्याचा आरोप आहे.
याचदरम्यान, या हत्येप्रकरणी दिवसेंदिवस राजकीय हस्तक्षेप वाढू लागल्याने हे प्रकरण ठाणे गुन्हे शाखेकडे वर्ग केल्यानंतर ठाणे खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन.टी. पाटील यांच्या पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारावर म्हात्रे यांचा अंगरक्षक जिग्नेश पटेल याला अटक केली.
यातच आता ठाणे खंडणी पथकाने वज्रेश्वरीतून गणेश गोपीनाथ पाटील (३०), विशू उर्फ विश्वपाल बाळाराम पाटील (२९) तर भिवंडी खारबाव येथून शंकर झा (३८) आणि विद्येश सुदाम पाटील (३७) अशा चौघांना बुधवारी अटक केली. यामध्ये गणेशने चॉपरने म्हात्रे यांच्यावर हल्ला चढवला होता.
विशूने मारेकऱ्यांना पळून जाण्यास मदत केली होती. तर विद्येशने या हत्येसाठी हत्यारे पुरवली असून, हत्येचा कट रचताना चौघे उपस्थित होते. तसेच हे चौघे जण प्रशांत म्हात्रेसाठी काम करीत होते. मात्र, म्हात्रे यांच्यावर गोळीबार करणारा अद्यापही फरार आहे. अटकेतील चौघांना गुरुवारी न्यायालयाने १६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)