कल्याण स्थानकात आणखी चार प्लॅटफॉर्म, मेल-एक्स्प्रेसची स्वतंत्र वाहतूक
By admin | Published: January 25, 2017 03:50 AM2017-01-25T03:50:57+5:302017-01-25T03:50:57+5:30
मध्य रेल्वे मार्गावरील मेल-एक्स्प्रेसच्या प्रवाशांना दिलासा देतानाच, उपनगरीय लोकल प्रवाशांचा प्रवास सुकर होण्यास मदत मिळणार आहे.
सुशांत मोरे / मुंबई
मध्य रेल्वे मार्गावरील मेल-एक्स्प्रेसच्या प्रवाशांना दिलासा देतानाच, उपनगरीय लोकल प्रवाशांचा प्रवास सुकर होण्यास मदत मिळणार आहे. त्यासाठी कल्याण यार्डची पुनर्रचना केली जाणार असून, त्यात चार नवीन प्लॅटफॉर्मची भर पडेल. या प्लॅटफॉर्ममधून मेल-एक्स्प्रेसची स्वतंत्र वाहतूक करण्याचे नियोजन असल्याची माहिती मध्य रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली. हा प्रस्ताव मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला आहे.
सीएसटीसह, लोकमान्य टिळक टर्मिनसवरील भार कमी करण्यासाठी ठाकुर्ली टर्मिनस उभारले जाणार आहे. त्यामुळे कल्याणपुढे येणाऱ्या मेल-एक्स्प्रेस कमी होऊन, लोकलचा वक्तशीरपणाही सुधारण्यास मदत मिळेल. सध्या प्राथमिक स्तरावरच असलेला टर्मिनसचा प्रकल्प होण्यास बराच कालावधी लागणार असल्याने, मध्य रेल्वेने कल्याण यार्डच्या पुनर्रचनेचा मोठा प्रकल्प हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पानुसार, लांब पल्ल्याच्या गाड्यांची कल्याणमधून स्वतंत्र वाहतूक केली जाईल. कल्याण स्थानक हे सध्या गर्दीचे स्थानक म्हणून मानले जाते. लोकलबरोबरच या स्थानकात मेल-एक्स्प्रेसच्या गाड्याही थांबतात. कल्याण येथून कसारा आणि कर्जत दिशेने लोकल जातात. अप आणि डाउन लोकल येतानाच, लांब पल्ल्याच्या गाड्यांचीही वर्दळ असते. त्यामुळे बराच खोळंबा उडतो आणि वेळापत्रकावर त्याचा परिणाम होतो. हे पाहता, कल्याण यार्डची पुनर्रचना केली जाणार आहे. त्यासाठी प्रस्तावच तयार करण्यात आला आहे.
कल्याण स्थानकात एक ते आठ प्लॅटफॉर्म असून, आठ नंबर प्लॅटफॉर्मच्या पूर्वेकडे रेल्वेची मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध आहे. या जागेत चार मार्गिका असून, येथून मालगाड्यांची वाहतूक होते. याच जागेचा वापर मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या चार नवीन प्लॅटफॉर्म बांधण्यासाठी केला जाईल, तर मालगाडी वाहतुकीसाठी या मार्गिकांच्या पूर्वेला असलेली रेल्वेचीच जागा वापरण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे लोकलचा आणि मेल-एक्स्प्रेसची वाहतूक स्वतंत्रपणे होईल. येथे कसारा मार्गावर मालगाडीसाठी उन्नत मार्गही असून, लांब पल्ल्याच्या गाड्या याच मार्गावरून थेट चार प्लॅटफॉर्मच्या दिशेने येतील.