Dr. Babasaheb Ambedkar यांच्या लिखाणाचे नवीन चार खंड येत्या डिसेंबरपर्यंत येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2021 08:27 AM2021-10-15T08:27:10+5:302021-10-15T08:28:04+5:30
Dr. Babasaheb Ambedkar: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्थशास्त्रावरील बहुचर्चित ग्रंथ ‘द प्रॉब्लेम ऑफ रुपी’ आता डिसेंबरमध्ये येणार आहे. यासोबतच आणखीही तीन ते चार नवीन खंड डिसेंबरपर्यंत लोकांच्या हाती येतील.
- आनंद डेकाटे
नागपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्थशास्त्रावरील बहुचर्चित ग्रंथ ‘द प्रॉब्लेम ऑफ रुपी’ आता डिसेंबरमध्ये येणार आहे. यासोबतच आणखीही तीन ते चार नवीन खंड डिसेंबरपर्यंत लोकांच्या हाती येतील. यातील काही ग्रंथांच्या छपाईच्या कामालाही सुरुवात झाली आहे, हे विशेष.
सन २००४ पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा एकही नवीन खंड प्रकाशित झालेला नाही, तसेच आजवर प्रकाशित एकाही इंग्रजी खंडाचा मराठी अनुवाद झालेला नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे गेल्या ३० मार्च रोजी पुनर्गठन झाले. तेव्हापासून नवीन खंड प्रकाशनाच्या अपेक्षा वाढल्या होत्या. विशेषत: ‘द प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा मूळ इंग्रजी ग्रंथ मराठीत लोकांपर्यंत यावा, अशी अनेकांची इच्छा होती. त्या दिशेने बरेचसे कामही झाले होते.
विजयादशमीच्या दिवशी एखादा ग्रंथ प्रकाशित होईल, अशी लोकांची इच्छा होती; परंतु ते शक्य झाले नाही. मात्र, येत्या दोन महिन्यांत म्हणजे डिसेंबरपर्यंत किमान चार नवीन खंड प्रकाशित होणार असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचिव डॉ. प्रदीप आगलावे यांनी सांगितले. या चार खंडांत ‘द प्रॉब्लेम ऑफ रुपी’ या महत्त्वाच्या ग्रंथाचा समावेश आहे.
हे साहित्य प्रकाशनाच्या वाटेवर
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचे मुखपत्र असलेल्या ‘जनता’ या नियतकालिकाच्या दुसऱ्या खंडाचे काम पूर्ण झाले आहे.
- इंग्रजी खंड-१३ च्या मराठी अनुवादित ग्रंथाचे कामसुद्धा पूर्ण झाले आहे. हा मराठी ग्रंथ १२०० पृष्ठांचा आहे.
- सोर्स मटेरिअलचा खंड १ -‘डॉ. आंबेडकर ॲण्ड द मूव्हमेंट ऑफ अनटचेबल्स, खंड ६, खंड ८, खंड १० या ग्रंथाचे पुनर्मुद्रणाचे कामदेखील अंतिम टप्प्यावर आहे.
दोन अप्रकाशित ग्रंथांचीही माहिती
विशेष महत्त्वाची बाब म्हणजे डॉ. आंबेडकरांच्या दोन अप्रकाशित ग्रंथाची माहिती मिळाली असून, त्या दोन ग्रंथांचा शोध घेणे सुरू आहे. त्यापैकी एक ग्रंथ नोव्हेंबरपर्यंत समितीला मिळू शकेल, असे प्रयत्न सुरू आहेत.
-डॉ. प्रदीप आगलावे, सदस्य सचिव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती
अशोक विजयादशमीला खंड प्रकाशन न होण्याची जणू परंपराच झाली आहे. नवीन समितीकडून ही परंपरा खंडित होईल, अशी अपेक्षा होती; परंतु ती फोल ठरली. ३० जुलै २०२१ च्या बैठकीत झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही.
- प्रकाश बन्सोड, अध्यक्ष, भारतीय दलित पँथर