कुरकुंभ स्फोटप्रकरणी चार अधिकाऱ्यांना अटक

By Admin | Published: September 21, 2016 01:31 AM2016-09-21T01:31:26+5:302016-09-21T01:31:26+5:30

कुरकुंभ (ता. दौंड) येथील ईटरनीस कंपनीत झालेल्या स्फोटात दोन ठार, तर दोन जखमी झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी झाली.

Four officers arrested in Kurakumbh blast case | कुरकुंभ स्फोटप्रकरणी चार अधिकाऱ्यांना अटक

कुरकुंभ स्फोटप्रकरणी चार अधिकाऱ्यांना अटक

googlenewsNext


कुरकुंभ : कुरकुंभ (ता. दौंड) येथील ईटरनीस कंपनीत झालेल्या स्फोटात दोन ठार, तर दोन जखमी झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी झाली. याप्रकरणी कंपनीतील ४ जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे.
श्रीराम सावळापूरकर (वय ४२), विजय खाडे (वय ४७, दोघे रा. विमाननगर पुणे), विकास बर्गे (वय ३६, रा. जनता कॉलनी, दौंड) व देवेंद्रसिंह धामी (वय ३६, रा. खोपोली) या चौघांना अटक करण्यात आली असल्याची माहिती ठाणेअंमलदार गोपाळ ओमासे यांनी दिली.
कुरकुंभच्या औद्योगिक क्षेत्रामधील सुरक्षा यंत्रणेचे वाभाडे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. औद्योगिक क्षेत्रामधील ईटरनीस या कंपनीमध्ये हायड्रोजनच्या रासायनिक अभिक्रियेदरम्यान झालेल्या भीषण स्फोटामुळे या विषयाला चालना मिळत आहे. ईटरनीस ही सुगंधी द्रव बनवण्याचा कच्चा माल उत्पादन करणारी कंपनी आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात हायड्रोजन वायूचा वापर केला जातो. परिणामी, हायड्रोजनचा साठा या ठिकाणी केला जातो. त्यामुळे या घटनेतून जर धडा घेतला नाही, तर एखादी मोठी दुर्घटना घडल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे उपाययोजना हे एकमेव सूत्र सर्व कंपनीच्या व्यवस्थापनाला पाळावेच लागेल.
कुरकुंभ औद्योगिक क्षेत्र हे रासायनिक उत्पादन करणारे एक महत्त्वाचे आणि मोठ्या प्रमाणात मोठ्या उद्योगांचे क्षेत्र मानले जाते. देशभरातून मोठ्या संख्येने कामगार या ठिकाणी येत असून अगदी जलद गतीने परिसरातील विकासात वाढ झालेली आहे.
या औद्योगिक क्षेत्रामधील रासायनिक कंपनीमधील सुरक्षाव्यवस्था अत्यंत दयनीय परिस्थिती आहे. त्यामुळे वारंवार होणारे अपघात व त्यामध्ये जाणारे कामगारांचे जीव याबाबत सहसा कुणीच बोलताना दिसत नाही. अपघातानंतर कंपनी निरीक्षक, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, पोलीस प्रशासन यंत्रणा जागृत होतात. मात्र, यामधून आजपर्यंत काहीच साध्य झाले नसल्याचे दिसते. त्यामुळे परिणामी या औद्योगिक कंपनीमध्ये काम करणारे कामगार व परिसरातील गावांना याचा धोका निर्माण झाला आहे. हा स्फोट झाल्यावर कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्याचे सलग्न अधिकारीवर्गाने टाळले आहे. त्यामुळे झालेल्या प्रकारावर काय निर्णय घेतला जाणार? हा येथील सामान्य नागरिकांना पडलेला प्रश्न कायम राहणार आहे.(वार्ताहर)
>सुरक्षा यंत्रणेचा कमीपणा
हायड्रोजनसारख्या वायूचा स्फोट होणे ही गंभीर बाब आहे. मात्र, तरीही या समस्यांचा सामना करण्यासाठी प्रभावी उपाययोजना अथवा सुरक्षा साधनांचा अभाव दिसतो. मोठ्या उद्योगसमूहाकडे देखील अग्निशामक वाहन गरजेचे आहे. मात्र, ते हातावर मोजण्याइतक्याच कारखान्यांनी व्यवस्था केल्याचे दिसते. रात्री घडलेल्या अपघाताला मदतकार्य सुरू करण्यासाठी वाट पाहणे हा सुरक्षा यंत्रणेचा कमीपणा दिसतो.
>अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामधील जवळपास सर्वच कंपन्यांचे उच्च पदस्थ अधिकारी वर्ग पुण्याला वास्तव करीत असल्यामुळे रात्रीअपरात्री झालेल्या अपघातावर अथवा एखाद्या घटनेबाबत निर्णय घेण्यास व साधने उपलब्ध करून देण्यात अडचणी निर्माण होतात. तर, रात्र पाळीतील सुरक्षा यत्रंणा या येथील सुरक्षारक्षक व अगदीच याबाबत साधारण माहिती असणाऱ्यांच्या भरवशावर असल्याचे वास्तव पाहावयास मिळते.

Web Title: Four officers arrested in Kurakumbh blast case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.