पुरवठा अधिकाऱ्यासह चौघांना अटक
By Admin | Published: June 9, 2017 04:39 AM2017-06-09T04:39:06+5:302017-06-09T04:39:06+5:30
पुरवठा निरीक्षण अधिकारी वासुदेव बिसन पवार यांच्यासह चौघांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने गुरुवारी रंगेहाथ अटक केली
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : रेशनकार्ड काढण्याकरिता १२ हजार रुपयांची लाच मागणारे पुरवठा निरीक्षण अधिकारी वासुदेव बिसन पवार यांच्यासह चौघांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने गुरुवारी रंगेहाथ अटक केली. आॅनलाइन रेशनकार्ड काढण्यामुळे त्यामधील भ्रष्टाचाराला आळा बसेल, ही अपेक्षा फोल ठरली आहे.
तहसील कार्यालयाच्या आवारातील ग्रामीण पुरवठा कार्यालयातील तिघा अधिकाऱ्यांसह एकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ई-महासेवा केंद्रामार्फत विविध शासकीय कागदपत्रे पुरवण्यात येतात. तक्रारदाराने त्यापैकी एका केंद्राद्वारे रेशनकार्ड काढण्यासाठी आॅनलाइन अर्ज केला व कागदपत्रे सादर केली होती. मात्र, नवीन रेशनकार्ड देण्याकरिता पुरवठा निरीक्षण अधिकारी वासुदेव बिसन पवार यांनी ५५०० रुपये, पुरवठा अव्वल कारकून संजय बाळाराम जाधव यांनी ४ हजार रुपये व संभाजी सिंधू चव्हाण यांनी १५०० रुपयांची मागणी केली होती. खासगी सहायक उदय पाटील यांनीही पैशांची मागणी केली होती. ई-महासेवा केंद्रचालकाने लाचलुचपत कार्यालयाकडे या तिघांबाबत तक्रार केली.
गेली दोन दिवस या तिघांवर नजर ठेवल्यावर गुरुवारी सापळा रचून
त्यांना ११ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत अधिकाऱ्यांनी अटक केली. आॅनलाइन अर्ज करणाऱ्यांना रेशनकार्ड मिळवून देण्याकरिता दलालाचे काम करणाऱ्या व्यक्तीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र, नंतर सोडून दिल्याचे समजते.