दोन हजारांत चौघांना अडीच महिने राबवले; कातकरी कुटुंबाची पिळवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2022 08:10 AM2022-09-17T08:10:36+5:302022-09-17T08:11:40+5:30

मालकावर गुन्हा दाखल, खदानीत काम करत असताना  मालकाकडून जबरदस्तीने  अवजड कामे करून घेतली जात. कामे न केल्यास शिवीगाळ वा दमदाटी केली जात असे.

Four out of two thousand were executed for two and a half months; Extortion of the Katkari family | दोन हजारांत चौघांना अडीच महिने राबवले; कातकरी कुटुंबाची पिळवणूक

दोन हजारांत चौघांना अडीच महिने राबवले; कातकरी कुटुंबाची पिळवणूक

googlenewsNext

रवींद्र साळवे
 
मोखाडा : रोजगारासाठी स्थलांतरित झालेल्या कुटुंबातील चार व्यक्तींना दोन हजार रुपयांत  अडीच महिने राबविणाऱ्या व कातकरी कुटुंबाची पिळवणूक करणाऱ्या  खदान मालकावर वेठबिगारी कायद्यांतर्गत मोखाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोखाडा तालुक्यातील पळसुंडा येथील महादू मुकणे (वय ६०), पत्नी लक्ष्मीबाई (वय ५५), मुलगा गणेश (वय १५) व मुलगी सविता (वय १२) हे कुटुंब जून महिन्यात  गणेशवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर येथे दगडखाणीच्या कामाला स्थलांतरित झाले होते. यावेळी एक ट्रॅक्टर दगड भरण्यासाठी ५०० रुपये मजुरी देण्याचे ठरले होते. परंतु खदान मालकाने त्यांच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन या कातकरी कुटुंबाची पिळवणूक करून फसवणूक केल्याचा आरोप या पीडित कुटुंबाने केला आहे.

खदानीत काम करत असताना  मालकाकडून जबरदस्तीने  अवजड कामे करून घेतली जात. कामे न केल्यास शिवीगाळ वा दमदाटी केली जात असे. तसेच दोन ते अडीच महिने काम करूनही त्यांना कामाचा मोबदलादेखील दिला नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 
दोन हजाराच्या दिलेल्या आगाऊ रकमेत चार व्यक्तींना अडीच महिने राबवून घेतले. यामुळे  मालकाच्या पिळवणुकीला कंटाळून अखेर १४ तारखेला काम सोडून घरी जाण्याचा निर्णय या कुटुंबाने घेतला. परंतु भाड्याला पैसे नसल्याने महादू मुकणे हे तिथूनच पायी-पायी निघाले. थोडीफार शिल्लक असलेल्या गंजीपुंजीतून गणेश, सविता व त्यांची आई लक्ष्मीबाई कसेबसे गाडीभाडे करून त्यांनी त्र्यंबकेश्वर गाठले व तेथून पायी येत असताना दुपारी १२.३० च्या दरम्यान त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाकेहर्षजवळ नवसू गारे, संतोष झिंजुर्डे, लक्षण खाडे, राजू पालवे या श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनास येताच संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर त्यांनी त्यांच्या वाहनाने मोखाडा पोलीस ठाण्यात दाखल केले. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष  विवेक पंडित यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन संघटनेच्या  पुढाकाराने  वेठबिगारीचा गुन्हा दाखल केला.

एकीकडे संपूर्ण देशात स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव साजरा होत असून त्याचबरोबर देशाच्या सर्वोच्च राष्ट्रपती पदावर आदिवासी समाजाच्या महिला विराजमान झाल्या आहेत. परंतु दुसरीकडे आदिवासी समाजातील आदिम  अनेक कातकरी कुटुंबे वेठबिगारीच्या पाशात अडकली आहेत. अशा शेकडो  कुटुंबांकडे शेती नाही, घर नाही. शासकीय कागदपत्रे नाहीत. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही या पीडित कुटुंबांनी मतदानाचा हक्क बजावलेला नाही. याला जबाबदार कोण? - विवेक पंडित, श्रमजीवी संघटना

Web Title: Four out of two thousand were executed for two and a half months; Extortion of the Katkari family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.