परमार आत्महत्येतील चार आरोपी पुन्हा रिंगणात
By admin | Published: February 5, 2017 01:20 AM2017-02-05T01:20:25+5:302017-02-05T01:20:25+5:30
राज्यभर गाजलेल्या बांधकाम व्यावसायिक सुरज परमार आत्महत्या प्रकरणात ज्या चार नगरसेवकांना अटक झाली, ते चौघेही आता पुन्हा निवडणूक रिंगणात आपले नशीब आजमावत आहेत.
ठाणे : राज्यभर गाजलेल्या बांधकाम व्यावसायिक सुरज परमार आत्महत्या प्रकरणात ज्या चार नगरसेवकांना अटक झाली, ते चौघेही आता पुन्हा निवडणूक रिंगणात आपले नशीब आजमावत आहेत.
राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला, हणमंत जगदाळे, काँग्रेसचे विक्रांत चव्हाण आणि अपक्ष सुधाकर चव्हाण यांचा त्यात समावेश आहे. मागील वर्षी आॅक्टोबर महिन्यात ठाण्यातील बिल्डर सुरज परमार यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती. त्यांनी मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेल्या डायरीत महापालिकेतील या चार नगरसेवकांची नावे पुढे आली होती. त्यानंतर, पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांनी दोन ते तीन महिने न्यायालयीन कोठडीत घालवले होते. आता हेच चेहरे पुन्हा निवडणूक रिंगणात उतरले आहेत. सुधाकर चव्हाण यांनी, तर निवडणूक लढवण्यासाठी भाजपामध्ये जाण्याचा विचारही केला होता. परंतु, त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी जाहीर झाल्याने आणि त्यांच्या नावाला भाजपामधूनच विरोध होऊ लागल्याने त्यांचा पक्ष प्रवेशाचा पत्ता कापला गेला होता. त्यानंतर, आता त्यांनी प्रभाग क्रमांक-५ मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या ठिकाणी भाजपाने कमकुमत उमेदवार दिलेला आहे. तर, हणमंत जगदाळे यांनी प्रभाग क्र. ६ मधून, विक्रांत चव्हाण यांनी प्रभाग क्रमांक ७ मधून आणि नजीब मुल्ला यांनी प्रभाग क्र. १० मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आता मतदारराजा त्यांना कितपत साथ
देतो, हे आता येणारा काळ ठरवणार आहे.