भीषण अपघातात चौघांचा मृत्यू
By admin | Published: December 25, 2016 06:40 PM2016-12-25T18:40:34+5:302016-12-25T18:42:49+5:30
वेगाशी स्पर्धा करीत नागपूरकडे येणारी कार अनियंत्रित झाल्याने दुभाजकावरून उसळून विरुद्ध मार्गाने येणाऱ्या ट्रकवर आदळली.
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 25 - वेगाशी स्पर्धा करीत नागपूरकडे येणारी कार अनियंत्रित झाल्याने दुभाजकावरून उसळून विरुद्ध मार्गाने येणाऱ्या ट्रकवर आदळली. त्यामुळे झालेल्या भीषण अपघातात कारमधील चौघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर एक गंभीर जखमी आहे. नागपूर - वर्धा - चंद्रपूर महामार्गावरील जामठा शिवारात रविवारी दुपारी ३.१० वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. यामुळे काही वेळ मार्गावरची वाहतूक प्रभावित झाली होती.
एमएच-४० / एफ-०९५२ क्रमांकाच्या कारमध्ये बसून पाच जण वर्धेहून नागपूरकडे येत होते. कारचा वेग मर्यादेपेक्षा जास्त होता. नागपूरनजीकच्या जामठा शिवारात पोहोचताच कारचालकाचा ताबा सुटला आणि अनियंत्रित कार दुभाजकावरून उसळून विरुद्ध मार्गाने येणा-या आयशर ट्रकवर (एमएच-४९/९१९२) आदळली. त्यानंतर तेवढ्याच वेगात ही कार परत वर्धा मार्गावर येऊन पडली.
कारचा वेग आणि धडक एवढी जोरदार होती की आयशर ट्रकही उलटला अन् कारचे इंजिन तुटून १५ ते २० फूट दूर वेगळे होऊन पडले. कारमधील पाच पैकी चौघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. ट्रकचालक राकेश शंभरकर यालाही या अपघातात जबर दुखापत झाल्याचे कळते. या अपघातामुळे नागपूर - वर्धा - चंद्रपूर मार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. माहिती कळताच बुटीबोरी, हिंगणा आणि सोनेगाव तसेच गस्तीवरील पोलीस घटनास्थळी धावले. त्यांनी दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. कारमधील चौघांचा मृत्यू झाल्याने आणि एक गंभीर जखमी असल्यामुळे मृतांची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी कारच्या नंबरवरून प्रयत्न सुरू केले.