महावितरणच्या तीन अभियंत्यांसह चार जण निलंबित
By Admin | Published: July 4, 2015 12:32 AM2015-07-04T00:32:11+5:302015-07-04T00:32:11+5:30
वीज जोडणीसाठी शेतकरी दाम्पत्याने केला होता आत्महत्येचा प्रयत्न.
अकोला : विद्युत जोडणी न मिळाल्याने बाळापूर तालुक्यातील सागद येथील शेतकरी दिलीप तायडे आणि त्यांची पत्नी राधा यांनी बुधवारी विषारी औषध प्राशन केले होते. या प्रकरणात वीज जोडणीसाठी तायडे यांच्याकडून लाच घेणार्या महावितरणच्या दोन अभियंत्यांसह एका तंत्रज्ञास शुक्रवारी निलंबित करण्यात आले. दरम्यान, औद्योगिक वीज जोडणी देण्यासाठी विलंब करणार्या आणखी एका अभियंत्यांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तेल्हारा तालुक्यातील तळेगाव बाजार येथील शेतकरी विनोद खारोडे यांनी वीज जोडणी मिळत नसल्यामुळे मे महिन्यात आत्महत्या केली. त्यानंतर बाळापूर तालुक्यातील सागद येथील शेतकरी दिलीप तायडे व राधा तायडे या दाम्पत्याने १ जुलै रोजी विषारी औषध प्राशन केले होते. दिलीप तायडे यांना प्रलंबित विद्युत जोडणीसाठी अभियंता, कंत्राटदार व दलालांकडून पैशाची मागणी करण्यात आली. त्यामुळे पैसे कोठून आणावेत, या विवंचनेत दिलीप तायडे होते. अखेर दोन वर्षांपूर्वी त्यांनी पत्नीचे मंगळसूत्र विकून तत्कालीन अभियंता गणगणे यांना १५ हजार रुपये दिल्याचा आरोप दिलीप तायडे यांचे बंधू पुरुषोत्तम तायडे यांनी केला. या प्रकरणी महावितरणने बाळापूर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता पांडुरंग सांगोळे, कारंजा रमजानपूर शाखेचे तत्कालीन सहायक अभियंता आशिष गणगणे आणि याच शाखेचे तंत्रज्ञ चंद्रकांत इंगळे यांना शुक्रवारी निलंबित केले. औद्योगिक कंपनीच्या वीजपुरवठय़ाला विलंब, अधिकारी निलंबित आकोट येथील औद्योगिक कंपनीचा वीज जोडणीचा अर्ज महावितरणकडे सादर करण्यात आला होता; मात्र या कंपनीला वीज जोडणी देण्यास विलंब करण्यात आला. त्यामुळे अकोला मंडळ कार्यालयातील उपकार्यकारी अभियंता प्रभाकर दहापुते यांनाही निलंबित करण्यात आले आहे. लाचखोरांविरुद्ध महावितरणची पोलिसांकडे तक्रार महावितरणने बाळापूर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता पांडुरंग सांगोळे, कारंजा रमजानपूर शाखेचे तत्कालीन सहायक अभियंता आशिष गणगणे आणि याच शाखेचे तंत्रज्ञ चंद्रकांत इंगळे यांना निलंबित करून, त्यांच्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रारही दाखल केली आहे. या तिघांविरुद्ध कायद्यानुसार कारवाई करण्याचे महावितरणने या तक्रारीत म्हटले आहे.