माजी नगराध्यक्ष सचिन शेळके हत्येप्रकरणी चार जण ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2016 09:43 AM2016-10-17T09:43:17+5:302016-10-17T09:43:17+5:30
नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे माजी शहराध्यक्ष सचिन शेळके हत्येप्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतलं आहे
>ऑनलाइन लोकमत
पिंपरी चिंचवड, दि. 17 : नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे माजी शहराध्यक्ष सचिन शेळके हत्येप्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतलं आहे. रविवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास खांडगे पेट्रोल पंपासमोर हल्लेखारांनी सचिन शेळके यांच्यावर हल्ला करुन निघृण खून हत्या केली होती. पूर्ववैमनस्यातून सचिन शेळकेंचा खून केल्याच्या आरोपाखाली श्याम रामचंद्र दाभाडे याच्यासह दहा जणांवर भारतीय दंड विधान कलम 302, 34 भारतीय आर्म्स अॅक्ट 352, 427 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंटी दाभाडे, खंडू पचपिंड, संदीप पचपिंड आणि आकाश लोखंडे या चौघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.
नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावरच हा प्रकार घडल्यामुळे तळेगावमध्ये तणावाचे वातावरण आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव स्टेशन येथे सचिन शेळके रविवारी सकाळी अकराच्या सुमारास विरोधी पक्षनेते सुनील शेळके यांची भेट घेतल्यानंतर कारने खांडगे पेट्रोल पंपाच्या दिशेने निघाले होते.
सव्वा अकराच्या सुमारास पेट्रोल पंपासमोरच हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. तसेच सत्तूरीने वार केले आणि हल्लेखोर पळून गेले. दरम्यान ही घटना पाहणाऱ्या नागरिकांनी गंभीर जखमी झालेल्या शेळकेंना पवना हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचरादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
तळेगाव बाजारपेठ बंद
या घटनेनंतर तळेगाव दाभाडे परिसरात मोठ्याप्रमाणावर तणावाचे वातावरण असून तळेगाव दाभाडेची बाजारपेठ बंद केली आहे. पुण्यातील ससुन रुग्णालयात त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तसेच या घटनेचा निषेध करण्यासाठी आमदार बाळा भेगडे यांनी संपूर्ण मावळ बंदचे आवाहन केले आहे.
घटनास्थळी सापडली काडतुसे
मोठ्याप्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. हल्लेखोरांनी प्रथम हवेत गोळीबार केला. त्यामुळे घटनास्थळी जीवंत चार काडतुसे सापडली आहेत. तळेगाव दाभाडे पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरु केला आहे. पूर्ववैमनस्यातून खून झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शेळके यांची खून झाल्याने तनाव निर्माण झाला आहे.
माजी नगराध्यक्ष सचिन शेळके
कार्यकर्ता ते नगराध्यक्ष अशी सचिन शेळके यांची वाटचाल आहे. तळेगाव स्टेशन येथे शेळकेवस्ती येथे शेळके यांचे निवासस्थान असून भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख असून प्रभाग एक मधून एकदा निवडूण आले आहेत. तसेच भारतीय जनता पक्षांचे शहराध्यक्षपद भूषविले आहे. तसेच नगरसेवक, उपनगराध्यक्ष, प्रक्षप्रतोद आणि २००९- २०१० मध्ये त्यांनी नगराध्यक्षपद भूषविले आहे. प्रभाग क्रमांक एक मधून शेळके निवडणूकीसाठी इच्छुक होते. त्यांच्या पाठीमागे पत्नी, आई-वडील, तीन भाऊ, दोन मुली असा परिवार आहे.