चार टप्प्यात होणार राज्यातील २१२ नगरपालिका आणि नगरपरिषेदेची निवडणूक

By admin | Published: October 17, 2016 05:05 PM2016-10-17T17:05:48+5:302016-10-17T17:53:17+5:30

राज्यातील 212 नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी 27 नोव्हेंबर, 14, 18 डिसेंबर व 8 जानेवारीला मतदान होणार आहे. 192 नगरपरिषदांच्या थेट अध्यक्षपदांसाठी देखील मतदान

Four phases will be held in 212 municipalities and municipality elections in the state | चार टप्प्यात होणार राज्यातील २१२ नगरपालिका आणि नगरपरिषेदेची निवडणूक

चार टप्प्यात होणार राज्यातील २१२ नगरपालिका आणि नगरपरिषेदेची निवडणूक

Next

212 नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी 27 नोव्हेंबर, 14, 18 डिसेंबर व 8 जानेवारीला मतदान
192 नगरपरिषदांच्या थेट अध्यक्षपदांसाठीदेखील मतदान
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 17: राज्यातील एकूण 192 नगरपरिषदा व 20 नगरपंचायतींच्या (एकूण 212) सार्वत्रिक निवडणुकांसाठी चार टप्प्यांत 27 नोव्हेंबर, 14 व 18 डिसेंबर 2016 आणि 8 जानेवारी 2017 रोजी मतदान होणार आहे. त्याचबरोबर यातील 192 नगरपरिषदांच्या थेट अध्यक्षपदांच्या निवडणुकांसाठीदेखील संबंधित दिवशी मतदान होईल आणि मतदानानंतर लगेच दुसऱ्या दिवशी संबंधित ठिकाणी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे केली.

 

श्री. सहारिया यांनी सांगितले की, यात मुदत संपणाऱ्या 190 नगरपरिषदा व 4 नगरपंचायती; तर नवनिर्मित 2 नगरपरिषदा व 16 नगरपंचायतींचा समावेश आहे. या सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या क्षेत्रात आणि त्याचबरोबर ज्या जिल्ह्यात चार किंवा त्यापेक्षा जास्त नगरपरिषदा/ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होत असल्यास त्या संपूर्ण जिल्ह्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून आचारसंहिता लागू झाली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित ठिकाणीची आचारसंहिता संपुष्टात येईल.

 

नामनिर्देशनपत्रांसाठी संगणक प्रणाली
नगरपरिषदांसाठी बहुसदस्यीय पद्धतीनुसार आणि थेट अध्यक्षपदांसाठी निवडणुका होतील; तर नगरपंचायतींच्या निवडणुका एकसदस्यीय पद्धतीने होतील. या निवडणुकांसाठी उमेदवारांना नामनिर्देशनपत्रे व शपथपत्रे सहजरितीने भरता यावे, यासाठी एक संगणक प्रणाली विकसित केली आहे. त्यासाठीच्या संकेतस्थळावरील नामनिर्देशनपत्रे आणि शपथपत्रात आवश्यक ती सर्व माहिती भरून त्याची प्रत काढावी (प्रिंट आऊट) आणि त्यावर सही करून ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे विहित वेळेत सादर करणे आवश्यक राहील, असे त्यांनी सांगितले.

जात वैधता प्रमाणपत्राचा पुरावा
राखीव प्रभागातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे; परंतु जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास त्यासाठी पडताळणी समितीकडे केलेल्या अर्जाची पोच पावती नामनिर्देशनपत्रासोबत सादर करण्याची मूभा देण्यात आली आहे. अशा उमेदवारांना निवडून आल्याचे घोषित झाल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे, अन्यथा त्यांची निवड भूतलक्षी प्रभावाने रद्द करण्याची संबंधित अधिनियमात तरतूद करण्यात आली आहे, असेही श्री. सहारिया यांनी सांगितले.

एक दृष्टिक्षेप

•मुदत संपणाऱ्या 190 नगरपरिषदा व 4 नगरपंचायती;
•नवनिर्मित 2 नगरपरिषदा व 16 नगरपंचायती
•एकूण 212 नगरपरिषदा व नगरपंचायती
•नगरपरिषदेच्या 192 थेट अध्यक्षपदासाठी निवडणूक
•एकूण प्रगाग 2,485
•एकूण जागा 4,750
•महिलांसाठी एकूण आरक्षित जागा 2,445
•अनुसूचित जातींसाठी एकूण आरक्षित जागा 608
•अनुसूचित जमातींसाठी एकूण आरक्षित जागा 198
•नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी एकूण आरक्षित जागा 1,315
महत्त्वपूर्ण उपाययोजना
•व्हिडिओग्राफी सर्व्हेलियन्स पथक
•भरारी पथक
•चेक पोष्टसाठी पथक
•तक्रार निवारण कक्ष
•निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती
•मतदार जागृती अभियान
•मतदारांना वोटर स्लीपचे वाटप

निवडणूक होणाऱ्या नगरपरिषदा व नगरपंचायतींची नावे

टप्पा क्र. 1:
27 नोव्हेंबर 2016 रोजी मतदान होणाऱ्या नगरपरिषदा व नगरपंचायतींची जिल्हानिहाय नावे अशी: पालघर: 1) विक्रमगड (नवीन न.पं.), 2) तलासरी (नवीन न.पं.) व 3) मोखाडा (नवीन न.पं.). रायगड: 1) खोपोली, 2) उरण, 3) पेण, 4) अलिबाग, 5) मुरूड-जंजिरा, 6) रोहा, 7) श्रीवर्धन, 8) महाड, व 9) माथेरान. रत्नागिरी: 1) चिपळूण, 2) रत्नागिरी, 3) दापोली न.पं., 4) खेड व 5) राजापूर. सिंधुदुर्ग: 1) वेंगुर्ले, 2) सावंतवाडी, 3) मालवण व 4) देवगड-जामसांडे (नवीन न.पं.). सोलापूर: 1) बार्शी, 2) पंढरपूर, 3) अक्कलकोट, 4) करमाळा, 5) कुर्डूवाडी, 6) सांगोला, 7) मंगळवेढा, 8) मैंदर्गी व 9) दुधनी. कोल्हापूर: 1) इचलकरंजी, 2) जयसिंगपूर, 3) मलकापूर, 4) वडगाव-कसबा, 5) कुरूंदवाड, 6) कागल, 7) मुरगुड, 8) गडहिंग्लज व 9) पन्हाळा. सांगली: 1) इस्लामपूर, 2) विटा, 3) आष्टा, 4) तासगाव, 5) कवठे-महाकाळ (नवीन न.पं.), 6) कडेगाव (नवीन न.पं.) 7) खानापूर (नवीन न.पं.), 8) शिरोळा (नवीन न.पं.) व 9) पलूस (नवीन नगर परिषद). सातारा: 1) सातारा, 2) फलटण, 3) कराड, 4) वाई, 5) म्हसवड, 6) रहिमतपूर, 7) महाबळेश्वर, 8) पाचगणी, 9) कोरेगाव (नवीन न.पं.), 10) मेढा (नवीन न.पं.), 11) पाटण (नवीन न.पं.), 12) वडूज (नवीन न.पं.), 13) खंडाळा (नवीन न.पं.) व 14) दहिवडी (नवीन न.पं.). नाशिक: 1) मनमाड, 2) सिन्नर, 3) येवला, 4) सटाणा, 5) नांदगाव व 6) भगूर. अहमदनगर: 1) संगमनेर, 2) कोपरगाव, 3) श्रीरामपूर, 4) शिर्डी, 5) रहाता, 6) पाथर्डी, 7) राहुरी व 8) देवळाली प्रवरा. नंदुरबार: 1) शहादा. धुळे: 1) शिरपूर-वरवाडे व 2) दोंडाईचा-वरवाडे. जळगाव: 1) भुसावळ, 2) चोपडा, 3) अंमळनेर, 4) चाळीसगाव, 5) पाचोरा, 6) यावल, 7) फैजपूर, 8) सावदा, 9) रावेर, 10) एरंडोल, 11) धरणगाव, 12) पारोळा व 13) बोदवड (नवीन न.पं.). जालना: 1) जालना, 2) भोकरदन, 3) अंबड व 4) परतूर. परभणी: 1) गंगाखेड, 2) सेलू, 3) जिंतूर, 4) मानवत, 5) पाथरी, 6) सोनपेठ व 7) पूर्णा. हिंगोली: 1) हिंगोली, 2) बसमतनगर व 3) कळमनुरी. बीड: 1) बीड, 2) माजलगाव, 3) परळी-वैजनाथ, 4) अंबेजोगाई, 5) गेवराई व 6) धारूर. उस्मानाबाद: 1) उस्मानाबाद, 2) परांडा, 3) भूम, 4) कळंब, 5) तुळजापूर, 6) नळदुर्ग, 7) मुरूम व 8) उमरगा. यवतमाळ: 1) यवतमाळ, 2) दिग्रस, 3) पुसद, 4) उमरखेड, 5) वणी, 6) घाटंजी, 7) आर्णी व 8) दारव्हा. अकोला: 1) अकोट, 2) बाळापूर, 3) मूर्तिजापूर, 4) तेल्हारा व 5) पातूर. वाशीम: 1) कारंजा, 2) वाशीम व 3) मंगरूळपीर. अमरावती: 1) अचलपूर, 2) अंजनगावसूर्जी, 3) वरूड, 4) चांदुरबाजार, 5) मोर्शी, 6) शेंदुरजनाघाट, 7) दर्यापूर, 8) चांदूर रेल्वे व 9) धामणगाव. बुलडाणा: 1) शेगाव, 2) नांदुरा, 3) मलकापूर, 4) खामगाव, 5) मेहकर, 6) चिखली, 7) बुलडाणा, 8) जळगाव-जामोद व 9) देऊळगाव राजा. वर्धा: 1) वर्धा, 2) हिंगणघाट, 3) आर्वी, 4) सिंदी, 5) पुलगांव व 6) देवळी. चंद्रपूर: 1) बल्लारपूर, 2) वरोरा, 3) मूल, 4) राजुरा व 5) सिंदेवाही (नवीन न.पं.) (एकूण 147 नगरपरिषदा व 18 नगरपंचायती).
टप्पा क्र. 2:
14 डिसेंबर 2016 रोजी मतदान होणाऱ्या नगरपरिषदांची जिल्हानिहाय नावे अशी: पुणे: 1) बारामती, 2) लोणावळा, 3) दौड, 4) तळेगाव-दाभाडे, 5) आळंदी, 6) इंदापूर, 7) जेजुरी, 8) जुन्नर, 9) सासवड व 10) शिरूर. लातूर: 1) उदगीर, 2) औसा, 3) निलंगा व 4) अहमदपूर. (एकूण 14 नगरपरिषदा).
टप्पा क्र. 3:
18 डिसेंबर 2016 रोजी मतदान होणाऱ्या नगरपरिषदा व नगरपंचायतींची जिल्हानिहाय नावे अशी: औरंगाबाद: 1) वैजापूर, 2) कन्नड, 3) पैठण, 4) गंगापूर व 5) खुल्ताबाद. नांदेड: 1) धर्माबाद, 2) उमरी, 3) हदगाव, 4) मुखेड, 5) बिलोली, 6) कंधार, 7) कुंडलवाडी, 8) मुदखेड, 9) देगलूर, 10) अर्धापूर (न.पं.) व 11) माहूर (न.पं.). भंडारा: 1) पवनी, 2) भंडारा, 3) तुमसर व 4) साकोली (नवीन न.पं.). गडचिरोली: 1) गडचिरोली व 2) देसाईगंज (एकूण 20 नगरपरिषदा व 2 नगरपंचायती).
टप्पा क्र. 4:
8 जानेवारी 2017 रोजी मतदान होणाऱ्या नगरपरिषदांची जिल्हानिहाय नावे अशी: नागपूर: 1) कामटी, 2) उमरेड, 3) काटोल, 4) कळमेश्वर, 5) मोहपा, 6) रामटेक, 7) नरखेड, 8) खापा व 9) सावनेर. गोंदिया: 1) तिरोरा व 2) गोंदिया (एकूण 11 नगरपरिषदा).

Web Title: Four phases will be held in 212 municipalities and municipality elections in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.