लोकशाहीचे चारही स्तंभ मजबूत व्हावेत
By admin | Published: April 20, 2017 07:01 AM2017-04-20T07:01:29+5:302017-04-20T07:01:29+5:30
लोकशाहीचे चारही स्तंभ मजबूत केले जात नाहीत; तोपर्यंत लोकशाही समृद्ध होणार नाही. सरकार म्हणून पत्रकार हल्ल्याविरोधी कायदा मंजूर करणे
पुणे : लोकशाहीचे चारही स्तंभ मजबूत केले जात नाहीत; तोपर्यंत लोकशाही समृद्ध होणार नाही. सरकार म्हणून पत्रकार हल्ल्याविरोधी कायदा मंजूर करणे हे आमचे कर्तव्य होते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी व्यक्त केले. स्वामी विवेकानंद यांच्यानंतर श्री श्री रविशंकर यांनी जगभरात अध्यात्माचा विचार व सत्याचा मार्ग अधिक प्रकटपणे मांडला, असे गौरवोद्गारही फडणवीस यांनी काढले.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने आर्ट आॅफ लिव्हिंगचे प्रणेते योगगुरू श्री श्री रविशंकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच पत्रकार हल्लाविरोधी कायदा मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचा ‘लोकमत’चे समूह संपादक दिनकर रायकर यांच्या हस्ते विशेष सत्कार झाला. या वेळी फडणवीस बोलत होते. पालकमंत्री गिरीश बापट, आॅल जर्नालिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष अशोक वानखेडे, लोकमतचे संपादक विजय बाविस्कर, संघाचे प्रदेशाध्यक्ष राजा माने, राज्य संघटक संजय भोकरे, सरचिटणीस गोविंद घोळवे, जिल्हाध्यक्ष किरण जोशी, वसंत मुंडे, मंदार फणसे आदी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, ‘‘जलयुक्त शिवारासाठी अनेक स्वयंसेवी संस्थांचा मदतीचा हात मिळाला. त्यात आर्ट आॅफ लिव्हिंगने सर्वाधिक काम केले आहे.’’ पत्रकारांच्या सुरक्षतेसाठी हल्ला विरोधी कायदा मंजूर केल्याचे बापट यांनी सांगितले.
रायकर म्हणाले, ‘‘विरोधी पक्षात असताना फडणवीस यांनी पत्रकार संरक्षणास पाठिंबा दिला. सत्तेत आल्यानंतर कायदा मंजूर केला. त्यामुळे त्यांचे मनापासून अभिनंदन.’’ वानखेडे यांनी मनोगत व्यक्त केले. संजय भोकरे यांनी प्रास्ताविक केले. राजा माने यांनी स्वागत केले. (प्रतिनिधी)