अध्यक्षपदासाठी चौरंगी लढत

By admin | Published: October 19, 2016 01:12 AM2016-10-19T01:12:18+5:302016-10-19T01:12:18+5:30

उमेदवाराने माघार न घेतल्यामुळे कवी प्रवीण दवणे, समीक्षक डॉ. अक्षयकुमार काळे, डॉ. मदन कुलकर्णी, डॉ. जयप्रकाश घुमटकर अशी चौरंगी लढत होणार

Four rounds of presidential election | अध्यक्षपदासाठी चौरंगी लढत

अध्यक्षपदासाठी चौरंगी लढत

Next


पुणे : आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीतून एकाही उमेदवाराने माघार न घेतल्यामुळे कवी प्रवीण दवणे, समीक्षक डॉ. अक्षयकुमार काळे, डॉ. मदन कुलकर्णी, डॉ. जयप्रकाश घुमटकर अशी चौरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मतदारांची प्रत्यक्ष भेट, पोस्टाद्वारे आपली भूमिका सांगणारी पत्रे, दूरध्वनीवरून संपर्क याबरोबरच फेसबुक आणि यूट्यूबसारख्या सोशल मीडियाचा वापर करून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न संमेलनाध्यक्षपदाचे दावेदार मानल्या जाणाऱ्या उमेदवारांकडून करण्यात येत आहे. नवोदितांना व्यासपीठ मिळवून देण्याबरोबरच ज्ञानशाखांनाही साहित्यकृतीचा दर्जा देत त्यांच्यासाठी समीक्षेची दालने खुली करण्याची भूमिका उमेदवारांकडून व्यक्त करण्यात आली आहे. मात्र संमेलनाध्यक्ष कोण होणार? यासाठी ११ डिसेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
>प्रवीण दवणे : आजकाल भाषेच्याबाबतीत उदासीनतेचे पर्व सुरू झाले आहे. आजकालची मुले भाषाज्ञानाबाबत भांबावलेली दिसतात. पुस्तकांचा खप हा वाचनसंस्कृतीचा पुरावा होऊ शकत नाही. खपलेली पुस्तके कितपत वाचली जातात, हे जाणून घेणे गरजेचे आहे. नवा वाचक निर्माण करायचा असेल तर साहित्यसेवा करण्याची गरज आहे. उमेदीच्या काळात व्यवस्थेत शिरून काम करण्याची गरज आहे. संमेलनाध्यक्षपदाला वेगळा दर्जा आणि वजन असते. त्यामुळे ही संधी घेऊन त्याचे सोने करण्याची माझी इच्छा आहे. सर्वच मतदारांपर्यंत पोहोचू शकेल की नाही, सांगता येत नाही. पण माझे साहित्य त्यांच्यापर्यंत पोहोचले आहे.
>डॉ. जयप्रकाश घुमटकर : खेडोपाड्यात विद्यार्थ्यांना भेटल्यानंतर त्यांच्यात प्रतिभा असल्याचे जाणवते, मात्र त्यांना व्यासपीठ मिळत नाही. त्यांच्या प्रतिभेला नख लावले जात आहे. त्यांना संधी मिळवून देणे, एक साहित्यिक चळवळ निर्माण करून त्यांच्यातील ऊर्जा तेवत ठेवणे यासाठी नक्कीच प्रयत्न करणार आहे. आज अनेक सामाजिक विषय आहेत, पण ते अंगावर घेण्याचे धाडस साहित्यिक करीत नाही. मात्र वास्तवादी विषय मांडणारे आणि ज्या साहित्याने समाजाचे प्रबोधन होते असे साहित्य लिहिले गेले पाहिजे. पुण्यापासून धुळे, नाशिक, औरंगाबाद, कर्नाटक, गुलबर्गा आदी विविध भागांतील मतदारांपर्यंत ‘डोअर टू डोअर’ जाऊन भेटणार आहे.
>डॉ. अक्षयकुमार काळे : बदलत्या परिस्थितीत मराठी भाषा, मराठी साहित्य, मराठी अभिरुची, वाचनव्यवहार आणि मराठी संस्कृती यांच्या अस्तित्वाचे आणि संवर्धनाचे प्रश्न जिकिरीचे बनले आहेत. मराठी लेखनव्यवहार, प्रकाशनव्यवहार, मराठी वाचनसंस्कृती यावर सातत्याने पुनर्विचार करून त्यांच्या संवर्धनाच्या प्रयत्नांची दिशा ठरविणे आज अपरिहार्य झाले आहे. मराठी समाज, भाषा आणि संस्कृती
यांच्या संवर्धनासाठी वचनबद्ध असणाऱ्या वाङ्मय आणि
संस्कृती यांचे परस्परसंबंध जाणणाऱ्या क्रियाशील सहृदय रसिकांशी संवाद करून त्यांच्या संवर्धनाच्या योग्य अशा दिशा ठरविता याव्यात, यासाठी मी प्रयत्नशील राहाणार आहे. प्रत्यक्ष गाठीभेटी घेता येणे शक्य नाही.
मात्र मतदारांना दूरध्वनी करणे, आपली भूमिका सांगणारी पत्रे पाठविणे
तसेच फेसबुक आणि यूट्यूबवरून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचणे यावर भर देणार आहे.
>डॉ. मदन कुलकर्णी : साहित्याची समीक्षा होणे गरजेचे आहे, मात्र समीक्षात्मक ग्रंथ लिहिण्याचे प्रमाण खूप कमी आहे. अध्ययनात ज्ञानशाखेची आवश्यकता आहे. समाजकारण, अर्थशास्त्र, राजकारण यांसारख्या ज्ञानशाखांचा उपयोग समीक्षेसाठी केला गेला पाहिजे. आज मराठी साहित्य संमेलनात ग्रामीण, दलित आणि आदिवासी किती प्रवाहांना आपण स्थान देतो. त्यांना मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक आहे. या भूमिकेमधून काम करणार आहे. मतदारांपर्यंत वैयक्तिक गाठीभेटीमधून संपर्क साधणे काहीसे अवघड आहे, मात्र माझे साहित्यातले योगदान आणि अध्यक्षपदाची भूमिका मतदारांपर्यंत पोहोचविणार आहे. काही मतदारांपर्यंत पत्र पोहोचले आहे.

Web Title: Four rounds of presidential election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.