‘तारकर्ली’त चौघे बुडाले
By admin | Published: July 19, 2015 11:46 PM2015-07-19T23:46:14+5:302015-07-19T23:47:58+5:30
इचलकरंजीच्या मुलीचा मृत्यू : सुरक्षा रक्षकाच्या सूचनांकडे दुर्लक्ष
मालवण : इचलकरंजी येथून मालवण तारकर्लीत पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांतील चार मुले बुडाल्याची घटना घडली आहे. यातील इतर तीन मुलांना वाचविण्यात यश आले, तर यात सलोनी राजेंद्र्रकुमार मेहता (वय १७, रा. इचलकरंजी, कोल्हापूर) या मुलीचा बुडून मृत्यू झाला. ही घटना एमटीडीसीच्या किनाऱ्यावर रविवारी सकाळी साडेआठ वाजता घडली.
तारकर्ली येथे शनिवारी सायंकाळी इचलकरंजी येथील कपड्यांचे व्यापारी मेहता आणि लालवाणी कुटुंबीयांतील १३ सदस्य टेम्पो ट्रॅव्हर्ल्समधून आले होते. रविवारी सकाळी सात वाजता सर्व पर्यटक समुद्र्रस्नानासाठी समुद्रात उतरले. त्यावेळी तेथील सुरक्षा रक्षकाने त्यांना समुद्र्रात आत जाऊ नका, असे सांगितले. काही वेळाने कुटुंबीय किनाऱ्यावर स्नान करीत होते, तर मुले समुद्र्रात आत जाऊन मौजमस्ती करीत होती. सुरक्षा रक्षकाच्या लक्षात येताच त्याने शिटी वाजवीत बाहेर येण्याची सूचना केली; मात्र पर्यटकांनी दुर्लक्ष केल्याने हा अनर्थ घडल्याचे बोलले जात होते. (वार्ताहर)
तिघांना वाचविण्यात यश
सुरक्षा रक्षकाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करीत निधी दिनेश लालवाणी (वय १३), किंजल विजयकुमार लालवाणी (१५), महावीर सुरेश लालवाणी (९) व सलोनी मेहता (१७) हे चौघे समुद्रात आत गेल्यानंतर मोठ्या लाटेत गटांगळ्या खाऊ लागले. यात सलोनी समुद्रात आत खेचली जाऊ लागली.
त्यावेळी कुटुंबीयांनी चौघांनाही पाण्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, सलोनी पाण्यात जास्त काळ राहिल्याने ती अत्यवस्थ बनली होती. चौघांनाही तातडीने १०८ रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात
आणण्यात आले.
सलोनी जास्त काळ पाण्यात राहिल्याने तिचा गुदमरून मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी
डॉ. सुरेश पांचाळ यांनी सांगितले. महावीर याला तत्काळ पाण्यातून बाहेर काढण्यात यश आल्याने त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती, तर निधी आणि किंजल यांना तातडीने रुग्णालयात दाखल केल्याने त्यांना वाचविण्यात यश आल्याचे
डॉ. पांचाळ यांनी सांगितले.
आईचा एकच आक्रोश
सलोनी हिचा मृत्यू झाल्याचे समजताच तिच्या आईने एकच आक्रोश रुग्णालयात केला. माझ्या मुलीला पहायचे आहे, अशा विनवण्या सलोनीची आई वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे करीत होती. काही वेळाने तिला सलोनीचा मृतदेह दाखविण्यात आला. तिला बघून आई- वडिलांनी टाहो फोडताच उपस्थितांचे मन हेलावले. इतर नागरिक व पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना समजावत धीर दिला.
गणपतीपुळे समुद्रात बुडताना अकराजणांना वाचवले
दोन महिलांचा समावेश : २४ तासांत दोन घटना
गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे समुद्रामध्ये रविवारी सकाळी ७ ते ८ या दरम्यान पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बुडालेल्या वेगवेगळ्या दोन ग्रुपमधील ७ जणांना वाचवण्यात यश आले असून, गेल्या २४ तासांत अकराजणांना वाचवण्यात येथील स्थानिक तरुणांना यश आले आहे.
गेले दोन दिवस जोडून सुट्ट्या आल्यामुळे गणपतीपुळे येथे चांगली गर्दी झाली होती. त्यातच सध्या खवळलेला समुद्र व वाढलेले समुद्राचे पाणी यामुळे या चौपाटीवर सुरक्षारक्षक समुद्रामध्ये अंघोळीसाठी जाऊ नये, असे सांगत असतानाच योग्य माहिती न मिळाल्याने समुद्रस्नानासाठी उतरलेल्या कैलास श्रीरंग खटावकर (वय ४६), सुवर्णा श्रीरंग खटावकर (३८), मानसी श्रीरंग खटावकर (१८) व प्रथमेश श्रीरंग खटावकर (१५) हे कुटुंब गणपतीपुळे पर्यटन निवासासमोर समुद्रामध्ये अंघोळ करीत होते.
मानसी हिला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पाण्यात बुडत असतानाच तिला वाचवण्यासाठी गेलेल्या श्रीरंग खटावकर व सुवर्णा खटावकर हेही बुडू लागले. मात्र आरडाओरडा झाल्याने समुद्राच्या काठावर व्यवसाय करणाऱ्या तरुणांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी तत्काळ धाव घेत या तिघांनाही सुखरूप बाहेर काढले. मात्र, सुवर्णा यांच्या पोटात समुद्राचे पाणी गेल्यामुळे मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.
मानसी हिच्यावर उपचार करून रत्नागिरी येथे जिल्हा रुग्णालयात हलविले आहे. दोघांचीही प्रकृती व्यवस्थित असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना घडून काही मिनिटे होतात न होतात तोपर्यंत गणपतीपुळे मंदिराजवळील गेस्ट हाऊससमोरील समुद्राच्या पाण्यात श्रीरामपूर, अहमदनगर येथून आलेल्या अनिल बी. दौंड (३६), जयराज घाघ (२२), सचिन नेटे (२३), विनायक दहिरे (२२) हे आंघोळीसाठी समुद्रामध्ये उतरले. विनायक याला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते बुडू लागले. सचिन व जयराज यांनी त्याला हात देऊन वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याला जोरदार प्रवाह असल्यामुळे विनायक याचा हात सुटला. त्यावेळेस समुद्रकिनारी असणाऱ्या तरुणांनी दोरी व रिंग यांच्या सहाय्याने त्यांना बाहेर काढले. काही वेळानंतर या चारही तरुणांनी युवकांचे आभारही मानले. या दोन्ही घटनांमधील सुमारे ११जणांना वाचवण्यासाठी येथील स्थानिक व्यावसायिक सूरज पवार, विश्वास सांबरे, मिलींद माने यांना यश आले. (वार्ताहर)
...तर कायदेशीर कारवाई
करणार : पोलीस निरीक्षक
४सध्या समुद्र खवळलेला असतो. अशावेळी मच्छिमार तसेच पर्यटक यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देऊनही उतरतात. मासेमारी बंदी कालावधी असतानाही स्वत:चा जीव धोक्यात घालून मच्छिमार मासेमारी करतात.
४आतापर्यंत अशांवर कारवाई केली नाही. मात्र, यापुढे मृत्यूस कारणीभूत ठरल्यास गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करणार असल्याचे पोलीस निरीक्षक विश्वजित बुलबुले यांनी
स्पष्ट केले.