जबरी चोरी प्रकरणी चौघांना अटक
By admin | Published: September 19, 2016 05:21 AM2016-09-19T05:21:55+5:302016-09-19T05:21:55+5:30
दागिने आणि मोबाइल असा ऐवज लुबाडणाऱ्या लोकेश ठाकरे (३०), गणेश पाटील (३५), सुकीर म्हात्रे (३२) आणि विनायक म्हात्रे (२९) या चौघांना कळवा पोलिसांनी रविवारी अटक केली
ठाणे : दुकानातील सोन्याचे दागिने चुपचाप द्या, अन्यथा तुम्हाला मारून टाकीन, अशी धमकी देत पाच लाख ६२ हजारांचे १८ तोळे वजनाचे दागिने आणि मोबाइल असा ऐवज लुबाडणाऱ्या लोकेश ठाकरे (३०), गणेश पाटील (३५), सुकीर म्हात्रे (३२) आणि विनायक म्हात्रे (२९) या चौघांना कळवा पोलिसांनी रविवारी अटक केली. त्यांना २० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
पूर्वी सोने गहाण ठेवण्याच्या व्यवहाराचा राग मनात धरून भगवानराम देवासी यांच्या कळवा शिवाजीनगर येथील कृष्णा ज्वेलर्स या दुकानात लोकेश आणि गणेश यांनी त्यांच्या साथीदारांसह १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास प्रवेश केला. नंतर त्यांनी काचेचा दरवाजा जबरदस्तीने बंद करून दुकानातील बद्रीराम आणि शामलाल या दोन्ही भावांचे मोबाइल फोन जबरदस्तीने हिसकावले. त्यानंतर त्यांना मारून टाकण्याची धमकी देत दुकानातील शोकेसमधील ९५ हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र, ३२ हजारांचा सोन्याचा हार, ४४ हजारांची सोनसाखळी असा पाच लाख ६२ हजारांचा ऐवज लुबाडला. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर चारही आरोपींना १८ सप्टेंबर रोजी पहाटे अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)