पेट्रोल पंपावरील दरोड्यातील आरोपींच्या शोधासाठी चार पथके
By Admin | Published: January 17, 2017 06:56 PM2017-01-17T18:56:37+5:302017-01-17T18:56:37+5:30
ऑनलाइन लोकमत लातूर,दि. 17 - लातूर-बार्शी रस्त्यावरील साखरा पाटीनजिक हिरेमठ पेट्रोल पंपावर सोमवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास अज्ञात तिघांनी ...
ऑनलाइन लोकमत
लातूर,दि. 17 - लातूर-बार्शी रस्त्यावरील साखरा पाटीनजिक हिरेमठ पेट्रोल पंपावर सोमवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास अज्ञात तिघांनी सशस्त्र दरोडा टाकला. या प्रकरणातील आरोपींच्या शोधासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजीराव राठोड यांनी चार पथकांची नियुक्ती केली आहे. घटनास्थळापासून काही अंतरावर गुन्ह्यातील दुचाकी आणि चोरट्यांनी बदललेले कपडे पोलिसांनी जप्त केले आहेत.
सोमवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास हिरेमठ पेट्रोल पंपावर तिघा अज्ञात दरोडेखोरांनी चेहऱ्याला स्कार्फ बांधून टाकलेल्या सशस्त्र दरोड्यात तब्बल सव्वालाख रुपयांपेक्षा अधिक मुद्देमाल लंपास केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी गातेगाव पोलीस ठाण्यात पंपावरील कर्मचारी विनोद रामसिंग ठाकूर (३५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात तिघांविरोधात सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि. पडवळ आणि सपोनि. दीपरत्न गायकवाड यांचे पथक तर गातेगाव पोलिसांचे आणि उपविभागीय अधिकारी राजेंद्र उनवणे यांच्या स्तरावर निर्माण करण्यात आलेली अशी एकूण चार पथके आरोपींच्या शोधासाठी नियुक्त करण्यात आली आहेत. ही चारही पथके वेगवेगळ्या दिशेने रवाना झाली आहेत.
याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजीराव राठोड यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. फरार झालेल्या दरोडेखोरांच्या अटकेसाठी तपास पथकांना विशेष सूचना केल्या आहेत. मंगळवारी सायंकाळपर्यंतही या चारही पोलीस पथकांच्या हाती कुठलाही सुगावा लागला नव्हता. दोन पथके उस्मानाबाद जिल्ह्यात आणि इतर दोन पथके बीड, सोलापूर जिल्ह्यात रवाना झाली आहेत.
दरोडा टाकतानाचे सीसीटीव्ही फूटेज-
https://www.dailymotion.com/video/x844ois