४० कोटी खर्चून बांधणार चार हजार घरे
By admin | Published: May 16, 2016 05:08 AM2016-05-16T05:08:02+5:302016-05-16T05:08:02+5:30
दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे व प्रतीक्षा यादीत असलेल्या चार हजार बेघर कुटुंबीयांना इंदिरा आवास योजनेतून घरकुले दिली जाणार आहे.
ठाणे : दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे व प्रतीक्षा यादीत असलेल्या चार हजार बेघर कुटुंबीयांना इंदिरा आवास योजनेतून घरकुले दिली जाणार आहे. त्यासाठी २०१६-१७ या आर्थिक वर्षात सुमारे ४० कोटी रुपयांचा निधी मिळणे अपेक्षित आहे.
जिल्हा प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या वर्षात सुमारे चार हजार घरकुले बांधण्याचे नियोजन आहे. एका घरकुलास सुमारे १ लाख रुपये खर्च आहे. यानुसार, सुमारे ४० कोटी रुपयांचा निधी जिल्ह्यातील या घरकुलांसाठी खर्च होणार आहे. मात्र, यासाठी सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षणातील नवीन दारिद्र्यरेषेची यादी प्रसिद्ध होणे गरजेचे आहे. या नव्या यादीतील सुमारे ४ हजार गरजू कुटुंबीयांना या घरकुलाचा लाभ देण्याचे नियोजन आहे. अन्यथा, जुन्या यादीतील कुटुंबीयांपैकी शिल्लक राहिलेली २ हजार घरकुलेही या वर्षी बांधावी लागणार आहेत. सामाजिक, आर्थिक जात सर्वेक्षणातील संपूर्ण त्रुटी पूर्ण केलेल्या आहेत. तसा अहवालही आता केंद्र शासनाकडे पाठवलेला आहे. त्यावर निर्णय होऊन नवीन दारिद्र्यरेषेची यादी लवकरच प्रसिद्ध होण्याची अपेक्षा जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे. त्यानुसार, या वर्षात जाहीर केलेली अर्थसंकल्पीय तरतूद खर्च करावी लागणार आहे. अन्यथा, हा निधी रद्द होण्याची भीतीही व्यक्त होत आहे.