राज्यात चार हजार रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत..-अवयवदान चळवळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 09:09 PM2017-09-23T21:09:20+5:302017-09-23T21:14:59+5:30
गणेश शिंदे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : राज्यात अवयवदान चळवळीला कृतिशील पाठबळ मिळत असून गेल्या तीन वर्षांत तब्बल ७०२ विविध अवयवांचे प्रत्यारोपण झाले आहे. लोकांच्या सकारात्मक भूमिकेमुळे नैसर्गिक अपंगत्व अथवा अपघाताने अवयव गमावलेल्यांच्या जीवनात प्रकाश पडला आहे मात्र अजून चार हजार रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत आहेत.
अवयवदान हे रक्तदानाइतकेच सर्वश्रेष्ठ दान आहे. याबाबत विविध सामाजिक संस्था गेली अनेक वर्षे समाजप्रबोधनाचे काम करीत आहेत; पण मृत्यूनंतर शरीराची चिरफाड करण्यास नातेवाईक तयार नसल्याने अजूनही अनेकांची अवयवदानाची मानसिकता दिसत नाही. तरीही अलीकडे खेडोपाडी विविध सामाजिक संघटनांच्या प्रयत्नांमुळे लोक अवयवदानाकडे वळू लागले आहेत.
अलीकडे बदललेली जीवनशैली, धकाधकीचे जीवन, अतिव्यसन व अन्नपदार्थांच्या माध्यमातून शरीरात होणाºया रासायनिक माºयामुळे माणसाचे अवयव लवकर निकामी होऊ लागले आहेत. मूत्रपिंड निकामी होण्याचे प्रमाण कमालीचे वाढले आहे.
मूत्रपिंड व यकृत प्रत्यारोपणाची ही शस्त्रक्रिया अतिशय खर्चाची आहे. या दोन्ही शस्त्रक्रिया सुमारे चार ते पाच तास चालतात व शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला १० ते १२ दिवस रुग्णालयातच रहावे लागते. या प्रकारे या शस्त्रक्रियेस व त्यानंतरच्या सुश्रुषेस बराच खर्च येतो म्हणून जरी मूत्रपिंड व यकृत दान मिळाले तरी संपूर्ण शस्त्रक्रिया व नंतरची महागडी औषधे यामुळे ती रुग्णावर मोफत करणे अशक्य असते. अशा स्वरुपाच्या शस्त्रक्रिया होण्यासाठी दात्या व्यक्तिच्या जवळच्या नातेवाईकांची संमती संपर्क ठेऊन त्यांना या दानाचे महत्व पटवून द्यावे लागते. अशा दात्याच्या व संबधित रुग्णाच्या रक्ताच्या तपासण्या करावे आवश्यक असते.
कायदा काय सांगतो...
मूत्रपिंड रोपण शस्त्रक्रियेत जिवंत व्यक्तीच्या दोनपैकी एकाच मूत्रपिंडाचे आरोपण मूत्रपिंड निकामी झालेल्या रुग्णाच्या शरीरात करता येते. यासंबंधीच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी १९९४ ला भारत सरकारने मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा अस्तित्वात आणून केवळ स्वत:च्या नातेवाइकांनी म्हणजे आई-वडील, भाऊ-बहीण, मुलगा-मुलगी, पती-पत्नी, आजी-आजोबा यांनाच मूत्रपिंड (किडनी) किंवा यकृताचा (लिव्हर) काही भाग दान करण्यास परवानगी दिली. त्यामुळे या दोन्ही अवयवांच्या प्रत्यारोपणामध्ये मर्यादा आल्या आहेत.
या व्यक्तींंचे अवयवदान उपयुक्त
मृत रुग्णांची मूत्रपिंडे, यकृत, प्लीहा, स्वादूपिंड, आतडी हृदय, फुप्फुसे व त्वचा अशा अवयवांचे आरोपण होऊ शकते. रुग्ण ब्रेनडेड घोषित झाल्यावर २४ ते ४८ तासांतच हे अवयव शस्त्रक्रियेद्वारे रुग्णांच्या शरीरातून काढून घ्यावे लागतात. मेंदूस्तंभ मृत्यू (ब्रेन डेथ), सामान्य मृत्यू (नॉर्मल डेथ) व जिवंत व्यक्ति (लाईव्ह डोनर) या व्यक्ती अवयवदान करू शकतात.
मेंदूमृत्यूमुळे अवयव प्रत्यारोपण वर्ष किडनी लिव्हर फुप्फुसे हृदय इतर अवयव एकूण
२०१५ ९७ ४१ ० ५ १३ १५६
२०१६ २०४ ११७ १ ३५ ३७ ३९३
जुलै २०१७ ७७ ४३ १ २३ ९ १५३
एकूण ३७८ २०१ २ ६३ ५९ ७०२