वासनकर समूहाच्या चार कंपन्या मुंबईत

By admin | Published: August 5, 2014 12:59 AM2014-08-05T00:59:01+5:302014-08-05T00:59:01+5:30

आजवर वासनकर समूहाच्या दोनच कंपन्या-वासनकर इन्व्हेस्टमेंट व वासनकर वेल्थ मॅनेजमेंट प्रा़लि़ सर्वांना माहिती होत्या़ परंतु आता या समूहाच्या आणखी किमान चार कंपन्या मुंबईमध्ये असल्याची

Four of Vansankar group companies in Mumbai | वासनकर समूहाच्या चार कंपन्या मुंबईत

वासनकर समूहाच्या चार कंपन्या मुंबईत

Next

विनय वासनकर समूहात अजूनही संचालक : सेबी व पोलिसांतर्फे संयुक्त चौकशी आवश्यक
सोपान पांढरीपांडे - नागपूर
आजवर वासनकर समूहाच्या दोनच कंपन्या-वासनकर इन्व्हेस्टमेंट व वासनकर वेल्थ मॅनेजमेंट प्रा़लि़ सर्वांना माहिती होत्या़ परंतु आता या समूहाच्या आणखी किमान चार कंपन्या मुंबईमध्ये असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे़
केंद्रीय कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाच्या वेबसाईटवर वासनकर समूहाच्या चार आणखी कंपन्या नोंदल्या आहेत़ त्यांची नावे परिधी ट्रेडिंग कंपनी प्रा़लि़, ओम भगवते कॅपिटल सर्व्हिसेस प्रा़लि़, वासनकर अ‍ॅग्रो वेल्थ प्रा़लि़ आणि एच अ‍ॅण्ड डब्ल्यू अ‍ॅग्रो प्रा़लि़ मजेची बाब म्हणजे या सर्व कंपन्यांचा नोंदणीकृत पत्ता एकच आहे़, तो म्हणजे फ्लॅट नं़ ४०६, चौथा मजला, बिल्डिंग नं़ २, साई मिलन हाऊसिंग सोसायटी, जीक़े़ मार्ग, वरळी, मुंबई-४४००१८़ या सर्व कंपन्यांचे वसूल भागभांडवल एक लाख रुपयाचे आहे़
यापैकी परिधी ट्रेडिंग ही सर्वात जुनी कंपनी असून ती ९ नोव्हेंबर १९९३ रोजी नोंदलेली आहे़ ही कंपनी वासनकरांनी विकत घेऊन नंतर तिचा उपयोग आपल्या गोरखधंद्यासाठी केल्याची शक्यता आहे़ बाकीच्या तीन कंपन्या २०१२ साली नोंदल्या आहेत़
या चारपैकी दोन कंपन्यांचे प्रशांत वासनकर संचालक आहे़ त्यामध्ये वासनकर अ‍ॅग्रो वेल्थ व परिधी ट्रेडिंग कंपनी़ त्यांची पत्नी भाग्यश्री तीन कंपन्यांची संचालक आहे़ त्यामध्ये परिधी ट्रेडिंग कंपनी, वासनकर अ‍ॅग्रो वेल्थ व ओम भगवते कॅपिटल सर्व्हिसेसचा समावेश आहे़
विनय वासनकरांचा दावा खोटा?
विनय वासनकरांनी आपल्या जामीन अर्जामध्ये आपण वासनकर वेल्थ मॅनेजमेंटचा राजीनामा दिल्यामुळे आपला वासनकर समूहाशी काही संबंध नाही़ त्यामुळे आपल्याला जामीन मिळावा, असा दावा केला होता़ परंतु हाती आलेल्या माहितीनुसार विनय वासनकर हे एच अ‍ॅण्ड डब्ल्यू अ‍ॅग्रो या कंपनीचे संचालक असल्याचे दिसून येते़ ही कंपनीसुद्धा वरील पत्त्यावर नोंदली आहे़ त्यामुळे ती वासनकर समूहाची कंपनी आहे़
चौधरीचे वडीलही संचालक
विनय वासनकरांशिवाय एच अ‍ॅण्ड डब्ल्यू अ‍ॅग्रोचे आणखी तीन संचालक आहेत़ ते म्हणजे श्रीकुमार बाबूराव लाखे, देवानंद बेनीश्याम सातपुते आणि जयंत गुलाबराव चौधरी़ यापैकी चौधरी हे अभिजित चौधरीचे पिताश्री आहेत़ अभिजित चौधरी हे प्रशांत वासनकरांचे शालक आहेत व त्यांनाही वासनकर बंधूंसोबतच अटक झाली आहे़
योगायोगाने देवानंद सातपुते हे स्प्रिंग ग्रीन अ‍ॅग्रो प्रा़लि़ या कंपनीचेही संचालक आहेत़ त्या कंपनीचा पत्ता केअर आॅफ अनुपम अ‍ॅग्रो बायोकेम, प्लॉट नं़ ए-२३/५, एमआयडीसी बुटीबोरी असा दिला आहे़ ही कंपनी वासनकर समूहाशी संबंधित आहे का, याबाबत मात्र कुठलीही माहिती मिळू शकली नाही़
ओम भगवते कॅपिटल सर्व्हिसेस या कंपनीमध्ये केवळ दोन संचालक आहेत़ ते म्हणजे भाग्यश्री वासनकर व मिथिला विनय वासनकऱ
दरम्यान, नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेतील सूत्रानुसार चौकशीमध्ये वासनकरांनी पैसे कुठे ठेवले किंंवा कुठली संपत्ती विकत घेतली किंवा रक्कम कुठे ठेवली याबद्दल ठोस माहिती आजपावेतो दिलेली नाही़ खरं तर वासनकर पोलिसांना चौकशीत सहकार्य करीत नाही व थातूरमातूर चिल्लर माहिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती आहे़ त्यामुळे आता या गंभीर घोटाळ्याचा तपास सिक्युरिटीज् अ‍ॅण्ड एक्स्चेंज बोर्ड आॅफ इंडिया (सेबी) व नागपूर पोलीस यांनी संयुक्तपणे केला तरच सत्य बाहेर येण्याची सत्यता आहे़
पैसे कुठे गेले?
या सर्व कंपन्या वासनकरांनी ‘खोका’ कंपन्या म्हणून काढल्या व त्यांचा उपयोग एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत पैसे वळविण्यासाठी आणि नंतर पैसे विदेशात हवाला मार्फत पाठविण्यासाठी उपयोग केला असावा, असा संशय घ्यायला भरपूर जागा आहे़ बाजारामध्ये असेही बोलल्या जात आहे की, प्रशांत वासनकर नियमितपणे दुबईला भेट देत होते आणि त्यांचे तिथे आॅफिसही आहे़ याचबरोबर मोठ्या संख्येने वासनकर समूहात जास्त व्याजाच्या लालसेपोटी गुंतवणूक केल्याची चर्चा आहे़

Web Title: Four of Vansankar group companies in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.