राज्यात थंडीने घेतले चार बळी; विदर्भ गारठला, गारपिटीचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 05:41 AM2019-12-30T05:41:54+5:302019-12-30T05:42:22+5:30
राज्यात थंडीचा कडाका वाढला असून, विदर्भ पुरता गारठला आहे.
पुणे/नागपूर : राज्यात थंडीचा कडाका वाढला असून, विदर्भ पुरता गारठला आहे. रविवारी भंडारा जिल्ह्यात पाढराबोंडी शेतशिवारात दवबिंदू गोठल्याचे दिसले. लाखंदूर तालुक्यातील सोनी संगममध्ये थंडीने चौघांचा बळी घेतला. सुमित्रा दुपारे (७०) ताराबाई पवार (६८) इंदिरा हुळे (६७) आणि तीमा बकाराम मेहंदळे (७०) अशी मृतांची नावे आहेत.
अरबी समुद्रावरून येणारे बाष्प पसरल्याने राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. पुढील चार दिवस विदर्भासह मराठवाड्यात काही ठिकाणी गारपिटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. सर्वात कमी तापमान चंद्रपूर येथे ५़१ अंश सेल्सिअस नोंदविले. खान्देशात थंडीचा जोर आहे. नाशिकचा पाराही ७.३ अंशापर्यंत खाली आला. पश्चिम महाराष्ट्रात गारठा कमी असून, किमान तापमान १७ ते २० अंशादरम्यान आहे. परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून, काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे़