राज्यातल्या सर्व टोलवर चारचाकी वाहने टोलमुक्त; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2023 08:59 AM2023-10-09T08:59:40+5:302023-10-09T09:04:52+5:30

आम्ही जी घोषणा केली होती त्यानुसार राज्यातल्या सर्व टोलवर फॉर व्हिलर किंवा छोट्या गाड्यांना आपण टोलमुक्त केले आहे असं फडणवीसांनी सांगितले.

Four-wheelers toll-free at all tolls in the state; Claimed by Deputy CM Devendra Fadnavis, MNS Criticized | राज्यातल्या सर्व टोलवर चारचाकी वाहने टोलमुक्त; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दावा

राज्यातल्या सर्व टोलवर चारचाकी वाहने टोलमुक्त; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दावा

googlenewsNext

मुंबई – मुलुंड-ठाणे टोलदरवाढीवरून मनसे नेते अविनाश जाधव यांनी आमरण उपोषणाचं आंदोलन हाती घेतले होते. ४ दिवसांपासून सुरु असलेल्या या आंदोलनाला मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भेट देत जाधव यांचे उपोषण मागे घेण्यास भाग पाडले. त्यानंतर टोलमुक्त महाराष्ट्र या भाजपा-शिवसेनेच्या जाहिरनाम्यावरून राज्य सरकारवर निशाणा साधला. राज ठाकरेंच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेगळाच दावा केला आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्ही जी घोषणा केली होती त्यानुसार राज्यातल्या सर्व टोलवर फॉर व्हिलर किंवा छोट्या गाड्यांना आपण टोलमुक्त केले आहे. केवळ व्यावसायिक वाहनांवरच आपण टोल आकारतो, राज्य सरकारकडून आपण पैसे दिलेले आहेत असा दावा त्यांनी केला. त्यामुळे राज्यातील सर्व टोलवर खरेच चारचाकी वाहनांकडून टोल घेतला जात नाही का असा प्रश्न आता लोकांना पडला आहे.

याबाबत लोकमतने सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी फडणवीसांचं विधान अर्धसत्य असल्याचे सांगितले. वेलणकर म्हणाले की,  २०१५ साली काही टोलनाके बंद केले होते, तर काही ठिकाणी चारचाकी वाहनांना सूट दिली होती. त्यात पुणे-औरंगाबाद रोडवरील टोल आहे. परंतु सगळ्याच ठिकाणी चारचाकी वाहनांना सूट देण्यात आली नाही. आजही मुंबई-पुणे जुना हायवे, मुंबई प्रवेश एन्ट्री पाँईट(वाशी, दहिसर, ऐरोली, मुलुंड) त्याचसोबतचे MSRDC चे टोलनाके, मुंबई-वांद्रे सागरी महामार्ग, समृद्धी महामार्ग याठिकाणी चारचाकी वाहनांना टोल आकारला जातो असं त्यांनी सांगितले.

तसेच राज्य सरकारने टोल कंत्राटदारांना दिलेले पैसे ही एकप्रकारची सर्वसामान्यांची लूट आहे. प्रत्येक टोलचा कॅपिटल आऊटलेट जाहीर झाला पाहिजे. किती पैसे खर्च झाले, किती वसूल झाले याची माहिती ठळकपणे दिली पाहिजे. पुणे-मुंबई एक्सप्रेस तयार होताना त्यातील ६० टक्के उत्पन्न टोलमधून तर ४० टक्के उत्पन्न जागा एक्सप्रेसच्या बाजूची जागा यातून मिळवणार होते. कॅपिटल आऊटलेटमध्ये हे सर्व सविस्तर सांगितले जाते. टोल कायद्यानुसार कॅपिटल आऊटलेट जाहीर करणे बंधनकारक आहे परंतु कुठेही असे केले जात नाही असा आरोप सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी केला.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या टोलमुक्त विधानावरून मनसेने खोचक टोला लगावला आहे. मनसेनं ट्विट करत म्हटलंय की, टोलमुक्त महाराष्ट्र झाला देखील आणि महाराष्ट्राला कळलं देखील नाही..किती 'भूल'थापा माराल. खरंच राजसाहेबांनी जे नाव ठेवलं होतं ते अगदी चपखल आहे... भाजपकुमार थापाडे  अशा शब्दात फडणवीसांवर टीका केली. 

 

Web Title: Four-wheelers toll-free at all tolls in the state; Claimed by Deputy CM Devendra Fadnavis, MNS Criticized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.