चार वर्षीय चिमुकलीने काढली वडिलांच्या मृतदेहाजवळ रात्रं !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2016 05:19 PM2016-10-17T17:19:47+5:302016-10-17T17:19:47+5:30
अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झालेल्या वडिलांच्या मृतदेहाजवळच चारवर्षीय चिमुकलीने अख्खी रात्रं काढली. ही हृदयदायक घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे.
ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. १७ : अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झालेल्या वडिलांच्या मृतदेहाजवळच चारवर्षीय चिमुकलीने अख्खी रात्रं काढली. ही हृदयदायक घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे. मोताळा तालुक्यातील टाकळी घडेकर येथील किशोर आत्माराम घडेकर (वय २८) यांना १६ आॅक्टोबर रोजी मुलगा झाला. आपल्या नवजात शिशुला पाहण्यासाठी व पत्नीला भेटण्यासाठी किशोर घडेकर हे कु.काजल नामक चार वर्षीय चिमुरडीला सोबत घेऊन एमएच२८-वाय९३४ या क्रमांकाच्या दुचाकीने रविवारी सायंकाळी मौजे गौलखेड गावाकडे निघाले होते.
दरम्यान, मलकापूर शहराबाहेरील बोदवड मार्गाने जात असताना त्यांच्या दुचाकीस रात्रीच्यावेळी अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत त्यांची दूचाकी रस्त्याच्या कडेला झाडाडुडपात फेकल्या गेली. या अपघातात किशोर घडेकर यांचे निधन झाले. तर सोबत असलेल्या त्यांच्या चार वर्षीय चिमुरडीला पित्याच्या मृतदेहाजवळच अख्खी रात्र काढावी लागली. पित्याचा मृत्यू झाल्याची बाब त्या चिमुरडीला कळली नाही. या परिसरात रात्री वर्दळ क्वचीतच असल्याने घडलेला प्रकार रात्री समोर आलाच नाही. ही बाब सोमवारी सकाळी रस्त्याने जाणाऱ्या एका दुध विक्रीचा व्यवसाय करणाऱ्याच्या निदर्शनास आली.
दुधविक्रेत्याने सदर माहिती नगरसेवक अॅड. हरीश रावळ व गजानन ठोसर यांना कळविली. त्यामुळे घटनास्थळावर एकच गर्दी झाली. किशोर घडेकर यांचा मृतदेह आणि जखमी अवस्थेतील काजलला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. कु.काजलच्या डाव्या हाताला फ्रॅक्चर निघाल्याने तिच्यावर मानस हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत. याप्रकरणी मृतकाचा भाऊ ईश्वर आत्माराम घडेकर (वय २५) रा.टाकळी घडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मलकापूर शहर पोलिसांनी अज्ञात वाहनाविरूध्द अप.नं.३६१/१६ कलम ३०४ अ २७९ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पीएसआय सुधाकर गवारगुरू व पोकाँ मनोज चव्हाण करीत आहेत.