स्कूलबसमधून पडून चार वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू
By admin | Published: February 9, 2017 11:21 PM2017-02-09T23:21:23+5:302017-02-09T23:21:23+5:30
वाहनातून खाली पडल्याने चार वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास औरंगाबाद महामार्गावरील यशवंत लॉन्समोर घडली़
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 9 - शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनातून खाली पडल्याने चार वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास औरंगाबाद महामार्गावरील यशवंत लॉन्समोर घडली़ मुकुंद प्रवीण कोल्हे (स्वामी समर्थ नगर, यशवंत लॉन्ससमोर, नांदूर नाका) असे या मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेमुळे शालेय विद्यार्थी वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
आडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंचवटी परिसरातील लिटील हर्टस् इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मुकुंद कोल्हे हा ज्युनियर केजीच्या वर्गात शिकत होता. त्याच्या पालकांनी शाळेत ने-आण करण्यासाठी मॅक्सिमो (एमएच १५, ईएफ ०५०२) वाहन लावलेले होते. गुरुवारी नेहमीप्रमाणे शाळा सुटल्यानंतर वाहनचालक रज्जाक शेख हा मुलांना घरी सोडवत होता़ सर्व मुलांना घरी सोडल्यानंतर शेवटचा विद्यार्थी हा मुकुंद कोल्हे होता.
वाहनचालक शेख याने उर्वरित मुलांना घरी सोडल्यानंतर केवळ मुंकुदला घरी सोडणे बाकी होते़ त्यातच घर अवघ्या पाचशे मीटर असल्याने मुंकुंद दरवाजात जाऊन उभा राहिला होता. त्यावेळी अचानक वाहनाचा दरवाजा उघडला गेला व चालू वाहनातून मुकुंद रस्त्यावरील खडीवर पडला. यामध्ये त्यास जबर मार लागल्याने प्रथम अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला़ या अपघात प्रकरणी आडगाव पोलिसांनी वाहनचालक रज्जाक शेख विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.