चार वर्षानंतर पुन्हा कोसळतेय सौताड्याच्या धबधब्याची धार !
By admin | Published: August 16, 2016 02:27 PM2016-08-16T14:27:34+5:302016-08-16T15:41:54+5:30
गेली चार वर्षापासून कोरडा ठाक पडलेला सौताड्याचा प्रसिध्द धबधबा यावर्षीच्या पावसाने धो-धो कोसळू लागला आहे.
Next
प्रताप नलावडे
ऑनलाइन लोकमत
बीड, दि. १६ - गेली चार वर्षापासून कोरडा ठाक पडलेला सौताड्याचा प्रसिध्द धबधबा यावर्षीच्या पावसाने धो-धो कोसळू लागला आहे. पाचशे फुटावरून वेगाने खाली येणारी पाण्याची धारही दररोज वाढतच चालली आहे. त्यामुळे या परिसरात पर्यटकांचीही गर्दी वाढू लागली असून श्रावण महिन्यातील तिसºया सोमवारी भरणाºया यात्रेचे वेध परिसरातील नागरिकांना लागले आहेत.
पाटोदा तालुक्यातील बीड आणि अहमदनगर या जिल्ह्याच्या सीमवेर असलेल्या सौताडा गावाला या धबधब्यामुळे वेगळी ओळख निर्माण झाली आहे. या ठिकाणी असलेल्या प्राचीन धबधब्याचे आकर्षण आणि ते पाहण्यासाठी सतत येणाºया पर्यटकांचा ओघ गेली चार वर्षे थांबला होता. दुष्काळी परिस्थिती असल्याने पाण्यासाठी या परिसरातील लोकांनाच भटकंती करण्याची वेळ आली होती.
यावर्षी मात्र या परिसरात चांगला पाऊस झाल्याने धबधब्याची धार सुरू झाली आणि दररोज ती वाढतच जात आहे. पाचशे फुट खोल दरीत धबधब्याजवळच रामेश्वराचे मंदिर आहे. श्रावण महिन्यात येथे दररोजच खूप मोठी गर्दी असते. या मंदिरासंदर्भात एक आख्यायिकाही सांगितली जाते. श्रीराम वनवासात असताना या परिसरात आले. सीतेला तहाण लागल्याने त्यांनी येथे बाण मारला आणि त्यामुळे ही दरी निर्माण झाली. याच ठिकाणी मग सीतेने महादेवाच्या मुर्तीची स्थापना केली आणि तेव्हापासून रामेश्वराचे वास्तव्य याठिकाणी कायमचे राहिले. याठिकाणी असणारी सीतेची नहाणीही प्रसिध्द आहे,
या मंदिरात जाण्यासाठी ३६५ पायºया उतरून दरीमध्ये जावे लागते. मंदिराच्या भोवतीच धबधब्याची धार कोसळत असल्याने या रम्य परिसरात काही काळ घालविण्यासाठी लोक आवर्जून येतात. हे मंदिर सध्या वन विभागाच्या ताब्यात असून या परिसरात वन विभागाच्या वतीने वृक्ष लागवडही मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे.
सौताडा हे बीड पासून ६० किलोमीटर अंतरावर आहे. बीड ते नगर मार्गावर पाटोद्यापासून पुढे दहा किलोमीटरवर हे गाव आहे.