चार वर्षांपुर्वी दहीहंडीच्या कार्यक्रमात विनयभंग करणाऱ्याची शिक्षा आणि दंड अपीलातही कायम
By Admin | Published: August 25, 2016 09:39 PM2016-08-25T21:39:04+5:302016-08-25T21:39:04+5:30
चार वर्षांपूर्वीच्या दहीहंडीच्या कार्यक्रमात गुलमंडी परिसरात विनयभंग करणाऱ्या पाणीपुरी चालकास प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी सुनावलेली तीन
ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 25 - चार वर्षांपूर्वीच्या दहीहंडीच्या कार्यक्रमात गुलमंडी परिसरात विनयभंग करणाऱ्या पाणीपुरी चालकास प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी सुनावलेली तीन महिन्यांची सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. गोसावी यांनी अपीलात कायम ठेवली.
या प्रकरणी सिडको एन-४ परिसरातील कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या २३ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, २२ आॅगस्ट २०११ रोजी गुलमंडी परिसरात दहीहंडीचा कार्यक्रम सुरू असताना फिर्यादी तरुणी ही तिच्या आईसोबत आजीच्या घरी जात होती. त्यावेळी मराठा हॉटेलसमोर पाणीपुरी विक्रेता लालसिंग बिंद्रावान कुशवाह (३८, रा. शहागंज) याने तरुणीच्या खांद्यावर हात ठेवला. गर्दीमुळे हात लागल्याचे वाटून तरुणीने त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र पुढे गेल्यावर गुलमंडीच्या पार्किंग परिसरात पुन्हा आरोपी लालसिंग याने तरुणीच्या खांद्यावर हात ठेवला. विनयभंगाच्या हेतुने त्याने हे कृत्य केल्याची खात्री झाल्यानंतर तरुणीने आरोपीला पकडून परिसरात बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर तरुणीने दिलेल्या फिर्यादीनंतर सिटीचौक पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध भा.दं.वि. कलम ३५४ (विनयभंग) अन्वये गुन्हा दाखल झाला.
या प्रकरणी तपास पूर्ण होऊन प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. शेख यांनी आरोपीला तीन महिने सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवसांच्या साध्या कैदेची शिक्षा ठोठावली होती. या शिक्षेला आरोपीने जिल्हा न्यायालयात आव्हान दिले असता, सहाय्यक सरकारी वकील सतीश मुंडवाडकर यांनी आरोपीविरुद्धचे सर्व साक्षी-पुरावे न्यायालयात सादर केले. सुनावणीअंती प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी सुनावलेली शिक्षा जिल्हा न्यायालयाने कायम ठेवली.