चार वर्षांच्या चिमुरडीवर भांडुपच्या शाळेत बलात्कार

By admin | Published: December 18, 2014 05:40 AM2014-12-18T05:40:36+5:302014-12-18T10:16:17+5:30

चार वर्षांच्या विद्यार्थिनीवर शाळा अधिकाऱ्याने केलेले लैंगिक अत्याचार कुटुंबीयांनी लाजेखातर दडवून ठेवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे

Four years old girl raped in Bhandup school | चार वर्षांच्या चिमुरडीवर भांडुपच्या शाळेत बलात्कार

चार वर्षांच्या चिमुरडीवर भांडुपच्या शाळेत बलात्कार

Next

मुंबई : चार वर्षांच्या विद्यार्थिनीवर शाळा अधिकाऱ्याने केलेले लैंगिक अत्याचार कुटुंबीयांनी लाजेखातर दडवून ठेवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. भांडुपमधील एका खासगी शाळेत हा प्रकार घडल होता. याहून धक्कादायक बाब ही, की त्रास होऊ लागल्याने ही चिमुरडी भांडुपच्या सावित्रीबाई फुले व घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी आली. सर्व प्रकार समजूनही रुग्णालयाने या गुन्ह्याची माहिती पोलिसांना दिली नाही.
भांडुप पश्चिमेकडील तुलशेत पाडा परिसरात असलेल्या माउंट मेरी या खासगी शाळेत ९ डिसेंबर रोजी ज्युनिअर केजीत शिकणाऱ्या चार वर्षांच्या चिमुरडीसोबत हा प्रकार घडला. मधल्या सुटीत शौचालयात गेलेल्या चिमुरडीसोबत शाळेच्या प्रशासकीय विभागात पर्यवेक्षक म्हणून कार्यरत असलेल्या केसरीनंदन उपाध्याय (३२) ऊर्फ छोटू सर याने लैंगिक चाळे केले. आई, मावशीसोबत आजोळी राहणाऱ्या या चिमुरडीने संध्याकाळी घरी जाताच घडला प्रकार आजीच्या कानावर घातला. घाबरलेल्या आजीने कुटुंबाला या प्रकाराची माहिती दिली. मात्र या प्रकाराचा बोभाटा झाल्यास अब्रू जाईल, समाजात नाक कापले जाईल या विचाराने कुटुंबाने पोलीस ठाणे गाठून तक्रार देणे टाळले. 

दरम्यान, रात्री उशिरा या चिमुरडीच्या पोटात वेदना होऊ लागल्या. दुसऱ्या दिवशी, १० डिसेंबरला आजीने चिमुरडीला भांडुपच्या सावित्रीबाई फुले प्रसुतीगृहात उपचारार्थ नेले. तेथील डॉक्टरांना घडला प्रकारही सांगितला. मात्र हे प्रसूती गृह आहे. येथे नातीवर उपचार होणार नाहीत असे सांगून डॉक्टरांनी आजीला राजावाडी रूग्णालय गाठण्याचा सल्ला दिला. सोबत प्रसुतीगृहाची रूग्णवाहिका जोडून दिली. राजावाडी रूग्णालयातही आजीने नातीवर घडला प्रकार सांगितला. राजावाडी रूग्णालयातून उपचार घेऊन त्याच दिवशी चिमुरडी घरी परतली.
मात्र १२ डिसेंबरला चिमुरडीचा त्रास वाढला. तिला असह्य वेदना होऊ लागल्या. त्यामुळे कुटुंबियांनी चिमुरडीला पुन्हा राजावाडी रूग्णालयात नेले. मात्र बाह्यरूग्ण विभागातील डॉक्टर निघून गेल्याने चिमुरडीला तसेच घरी आणण्यात आले.
दरम्यान, काल संध्याकाळी परिसरातील स्वयंसेवी संस्थेने चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या पर्यवेक्षकाविरोधात गुन्हा का दाखल करत नाही, असा जाब भांडुप पोलिसांना विचारला. तोवर भांडुप पोलिसांना असा काही प्रकार घडला असेल याची कल्पनाही नव्हती. अचानक झालेल्या या हल्ल्याने पोलीसही गांगरले. अखेर स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने भांडुप पोलिसांनी या चिमुरडीचे घर शोधून काढले. चिमुरडीला विश्वासात घेऊन बोलते केले. सोबत कुटुंबियांकडेही चौकशी केली. तेव्हा ९ डिसेंबरला घडलेला प्रकार समोर आला. सोबत कुटुंबियांना गुन्हा नोंदिवण्यास वाटलेल्या लाजेसोबत महापालिका रूग्णालयांचा भोंगळ कारभारही उघड झाला.

चिमुरडीने बोट दाखवताच आरोपी गजाआड
काल रात्री भांडुप पोलिसांनी या लहान मुलीचा, तिच्या कुटुंबियांचा जबाब नोंदवून घेतला. त्यात मुलीने छोटू सरांनी (आरोपी केसरीनंदन उपाध्याय)केलेल्या अत्याचाराची माहिती दिली. पोलिसांना छोटू सर इतकेच आरोपीचे नाव माहिती होते. त्यामुळे आज सकाळी शाळा उघडताच पोलिसांनी तेथे कार्यरत असलेल्या सर्वच पुरूषांना पोलीस ठाण्यात आणले आणि चिमुरडीसमोर उभे केले. तेव्हा चिमुरडीने आरोपी उपाध्याय उर्फ छोटू सर याच्याकडे बोट दाखवताच पोलिसांनी त्याला अटक केली. उपाध्यायविरोधात भांडुप पोलिसांनी बलात्कार आणि बाललैंगिक अत्याचारातील कलमांनुसार गुन्हा नोंदविला आहे. उद्या त्याला न्यायालयात हजर केले जाईल.


आरोपी आणि तक्रारदार मुलीच्या वैद्यकीय चाचण्या पार पडल्या असून त्यांचे अहवाल येणे बाकी आहे. तूर्तास आरोपी अटकेत आहे. उद्या त्याला न्यायालयात हजर केले जाईल. त्यानंतर त्याच्या पार्श्वभुमीबाबत तपास केला जाईल, 
- प्रताप चव्हाण, वरिष्ठ निरिक्षक, भांडुप

रूग्णालयांचीही होणार चौकशी
चिमुरडीवर लैंगिक अत्याचार घडल्याची माहिती असूनही ती पोलिसांना न देणाऱ्या सावित्रीबाई फुले व राजावाडी रूग्णालयातील संबंधीत डॉक्टर व कर्मचाऱ्यांची चौकशी होणार आहे, असेही चव्हाण यांनी लोकमतला सांगितले.

ही चिमुरडी रूग्णालयात आली होती. मात्र उपचारांआधीच तिचे पालक तिला घेऊन निघून गेले. ते परत आलेच नाहीत. रूग्णालयातील डॉक्टरांना या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती होती. पण चिमुरडीची तपासणी झाली नव्हती.
विद्या ठाकूर, वैद्यकीय अधिक्षक, राजावाडी रूग्णालय
---

शाळेच्या मान्यतेबाबतही होणार चौकशी
ही शाळा खासगी आहे. शिक्षण विभागाने या शाळेला परवानगी दिली होती का हेही पडताळून पाहाणार, अशी माहिती वरिष्ठ निरिक्षक चव्हाण यांनी दिली.
(प्रतिनिधी)

Web Title: Four years old girl raped in Bhandup school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.