धरणाच्या पुरात चार युवक वाहून गेले

By admin | Published: July 28, 2014 01:24 AM2014-07-28T01:24:55+5:302014-07-28T01:24:55+5:30

जिल्ह्यातील अप्परवर्धा व पूर्णा धरणाने पाण्याची पातळी ओलांडल्याने रविवारी सकाळी या दोन्ही धरणाचे दरवाजे उघडले. धरणाचे पाणी सोडल्याने पूर्णा नदीच्या पुरात तीन युवक आणि वरूड

Four youths were lost in the flood-hit area | धरणाच्या पुरात चार युवक वाहून गेले

धरणाच्या पुरात चार युवक वाहून गेले

Next

घाटलाडकीचा संपर्क तुटला : नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले, ११ गावांत पाणी शिरले
अमरावती : जिल्ह्यातील अप्परवर्धा व पूर्णा धरणाने पाण्याची पातळी ओलांडल्याने रविवारी सकाळी या दोन्ही धरणाचे दरवाजे उघडले. धरणाचे पाणी सोडल्याने पूर्णा नदीच्या पुरात तीन युवक आणि वरूड तालुक्यातही एक युवक असे चौघे पुरात वाहून गेले आहेत. तसेच चांदूरबाजार तालुक्यात चारगड प्रकल्प ओव्हर फ्लो झाल्याने या तालुक्यातील सुमारे आठ तर मोर्शी तालुक्यात तीन गावांमध्ये पूराचे पाणी शिरले. या गावांचा संपर्कही तुटला आहे. प्रशासनाने नागरिकांच्या मदतीने बचाव कार्याला प्रारंभ केला आहे.
पूर्णा धरणाचे सर्व नऊ दरवाजे तीन मीटरने उघडण्यात आल्याने नदी काठच्या ब्राह्मणवाडा थडी, काजळी, देऊरवाडा, चिंचोली, कुरळपूर्णा, पिंप्री, थुगाव आदी गावात पाणी शिरले. तसेच चारगड प्रकल्प ओव्हर फ्लो झाल्याने चारगड नदीला पूर येऊन घाटलाडकी गावातही पाणी शिरले. नदीच्या पुरामुळे या गावाचा संपर्क तुटला आहे. तसेच ११ गावे पाण्याखाली आली आहेत. ब्राह्मणवाडा थडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाणी शिरल्याने या केंद्रातील चार ते पाच कर्मचाऱ्यांनी विद्युत खांबावर चढून आपला बचाव केला.
नागरिकांनी त्यांच्या मदतीला धावून त्यांना सुखरूप बाहेर काढले. मात्र गावातील तीन युवक पुरात वाहून गेल्याची माहिती प्राप्त झाली आहे. यातील स्वप्निल वांगे (१७) याचा मृतदेह गावालगतच नदीच्या गाळात दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास आढळून आला. याशिवाय वरुड तालुक्यात तिवसा घाट येथील लंकेश हरिभाऊ तुमडाणे (२०) हा पुरात वाहून गेला. चुडामण नदीच्या पुरात आज रविवारी सहा मजूर अडकल्याची वार्ता पसरल्याने बघ्यांची गर्दी उसळली होती. लंकेश तुमडाणे हाही त्यांच्यात होता. दरम्यान, नदीच्या पुरात तो वाहून गेला. मोर्शी व चांदूरबाजार तालुक्यातील शेतीपीकही पुराच्या पाण्याखाली आले आहे. मोर्शी तालुक्यातून वाहणाऱ्या चारगड नदीच्या पुराचे पाणी खेड, उदखेड व खोपडा गावात शिरले. पुराचे पाणी अनेकांच्या घरात शिरले असून घरांच्या भिंतींची पडझड झाली. (प्रतिनिधी)

Web Title: Four youths were lost in the flood-hit area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.