चारचाकी उलटून तिघे जागीच ठार
By admin | Published: March 7, 2017 10:48 PM2017-03-07T22:48:31+5:302017-03-07T22:48:31+5:30
भरधाव चारचाकीचे टायर फुटून झालेल्या अपघातात भुसावळचे तिघे जण जागीच ठार झाले़ ठार झालेल्यांमध्ये १२ वर्षीय बालिका व पाच वर्षीय चिमुरड्यासह चालकाचा समावेश आहे़
ऑनलाइन लोकमत
भुसावळ, दि. 7 : भरधाव चारचाकीचे टायर फुटून झालेल्या अपघातात भुसावळचे तिघे जण जागीच ठार झाले़ ठार झालेल्यांमध्ये १२ वर्षीय बालिका व पाच वर्षीय चिमुरड्यासह चालकाचा समावेश आहे़ मलकापूरपासून काही अंतरावर असलेल्या हॉटेल अमनजवळ मंगळवारी दुपारी चार वाजता हा अपघात झाला़
लोणार (ता़मेहकर, बुलढाणा) नवजात बालकाच्या नामकरण कार्यक्रमासाठी (छिल्ला) कार्यक्रम आटोपून परतताना ही घटना घडल्याने भुसावळात शोककळा पसरली आहे़
सूत्रांच्या माहितीनुसार, भुसावळच्या मुस्लीम कॉलनीतील इरफान खान इद्रीस खान यांच्या मुलाच्या नामकरण कार्यक्रमासाठी कुटुंबासह आप्तेष्ट सोमवारी सकाळी चारचाकी (एम़एच़१९ ए़पी़९१३०) ने लोणारकडे निघाले होते़ कार्यक्रम आटोपून दुसऱ्या दिवशी मंगळवारी दुपारी परतताना मलकापूरजवळील हॉटेल अमनजवळ चारचाकीचे टायर फुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला जावून उलटल्याने चारचाकी चालक अफजल खान सलीम खान (वय २८, मुस्लीम कॉलनी, भुसावळ) तसेच जुबीयाबी शे़मुस्ताक अहमद (१२) व मुदस्सर खान इम्रान खान (५, मुस्लीम कॉलनी, भुसावळ) जागीच ठार झाले़
१२ प्रवासी किरकोळ जखमी
या अपघातात वाहनातील १२ प्रवासी किरकोळ जखमी झाले तर साहेमाबी अमीरखान (१९) या गंभीर जखमी झाल्या आहेत़ अन्य किरकोळ जखमींमध्ये इरफान खान इद्रीस खान (२४), अमीरखान इद्रीस खान (२६), नजीमाखातून इद्रीस खान (५१), , तबस्सुम इरफान खान (१८), इद्रीस खान अहमद खान (५६), नसीम बी़शेख सलीम (३९), साजीया इम्रान खान (२५), जियान शेख मुस्ताक (वय ४), अलीना शेख इम्रान (४) (सर्व रा़मुस्लीम कॉलनी, भुसावळ) यांचा समावेश आहे़
शहरात शोककळा
अपघाताचे वृत्त शहरातील मुस्लीम कॉलनीत समजताच शोककळा पसरली़ अपघातातील जखमींवर शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे तर अपघातग्रस्त चारचाकी शहरातील माजी नगरसेवक शेख आरीफ गनी यांच्या मालकीची असल्याचे सांगण्यात आले़