कऱ्हाडातही चौदा कोटींचा अपहार
By Admin | Published: December 15, 2015 10:33 PM2015-12-15T22:33:43+5:302015-12-15T23:25:17+5:30
लेखापरीक्षकांची फिर्याद : अध्यक्ष, संचालक, शाखाधिकाऱ्यांसह अज्ञात लाभधारकांवरही गुन्हा--‘जिजामाता’चं अ(न)र्थकारण
कऱ्हाड : जिजामाता महिला सहकारी बँकेत अपहार झाल्याप्रकरणी साताऱ्यात गुन्हा दाखल झाला असतानाच कऱ्हाड शाखेतही १३ कोटी ७६ लाखांचा अपहार झाल्याची फिर्याद लेखापरीक्षकांनी पोलिसांत दिली आहे. या फिर्यादीवरून बँकेच्या अध्यक्षा अॅड. वर्षा माडगूळकर यांच्यासह अधिकारी, शाखाधिकारी व अपहाराच्या रकमेचा लाभ घेणाऱ्या अज्ञातांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. लेखापरीक्षक तानाजीराव बाबुराव जाधव यांनी कऱ्हाड शहर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, जिजामाता बँकेच्या अध्यक्षा अॅड. वर्षा माडगूळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष अच्युतराव कुलकर्णी, मुख्य कार्यालयातील अधिकारी गुलाब आवारे, कऱ्हाड शाखेतील अधिकारी सुनील बी. हिवरे, स्मिता यू. मोहिते (मोनल शिंदे), तत्कालिन सर्व शाखाधिकारी, तत्कालिन संचालक मंडळ संजीवनी पिंगळे, सुनीता माने, सुजाता भुजबळ, प्रेमलता ठकार, मेघा कुलकर्णी, लता गायकवाड, पवित्रा तपासे, शरयू उंडाळे, लीला निसाळकर, नीता कणसे, रोहिणीदेवी लाळे, सुरेखा पाटणकर, संध्या लिपारे, छाया बकरे, तेजस्विनी भिसे तसेच अपहार झालेल्या रकमेचा लाभ घेणाऱ्या अज्ञात व्यक्ती व संस्थांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लेखापरीक्षक तानाजीराव जाधव हे जिजामाता महिला सहकारी बँकेचे लेखापरीक्षक म्हणून काम करीत होते. एक एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१४ या कालावधीत वर्षा माडगूळकर यांच्यासह अधिकारी, शाखाधिकारी, अज्ञात व्यक्ती व संस्था यांनी संगनमत करून कऱ्हाड शाखेतील दप्तरी रेकॉर्डला वेळोवेळी पोकळ व खोट्या नोंदी केल्याचे जाधव यांना दिसून आले. तसेच बँकेतून चेकने, आरटीजीएस, एनईएफटीने व वर्ग नोंदी करून १३ कोटी ७६ लाख ६४ हजार ३८६ रूपयांचा अपहार केल्याचेही स्पष्ट झाल्याने त्यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
अटकपूर्व जामिनावर युक्तिवाद
रमेश चोरगे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अॅड. वर्षा माडगूळकर आणि शिरीष कुलकर्णी यांनी न्यायालयात दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी सोमवारी झाली. अॅड. ताहेर मणेर यांनी अॅड. माडगूळकर, कुलकर्णी यांच्या वतीने युक्तिवाद केला. सरकारी पक्षातर्फे युक्तिवाद झाला नाही. न्यायालयाने एकतर्फी युक्तिवाद ऐकून अटकपूर्व जामिनावरील निर्णय निकालावर ठेवला आहे. दरम्यान, जिजामाता सहकारी बँकेतील अपहारप्रकरणी लेखा परीक्षकांच्या फिर्यादीनुसार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणीही अॅड. माडगूळकर आणि कुलकर्णी यांच्या वतीने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. या अर्जावरील सुनावणी दि. १७ रोजी होण्याची शक्यता आहे.
बँकेवर प्रशासक नेमण्याची उपनिबंधकांकडून शिफारस
सातारा : बहुचर्चित जिजामाता महिला सहकारी बँकेवर प्रशासक नेमण्यात यावा, अशी शिफारस जिल्हा उपनिबंधक डॉ. महेश कदम यांनी सहकार आयुक्तांकडे केली आहे. रिझर्व्ह बँक व राज्याचा सहकार विभाग यांच्या समन्वयातून या अहवालाबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
रिझर्व्ह बँकेने जिजामाता महिला सहकारी बँकेवर ठपका ठेवून दि. १0 जुलै २0१५ रोजी निर्बंध घातले आहेत. त्यामुळे बँकेचे व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यातच बँकेचे लेखापरीक्षक तानाजीराव जाधव यांनी २0१३ मध्ये साताऱ्यात बँकेच्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी रमेश चोरगे यांनी बँकेच्या आवारात आत्महत्या केल्याने हे प्रकरणही बँक संचालकांच्या अंगाशी आले आहे.
या संपूर्ण पार्श्वभूमीवर जिजामाता महिला सहकारी बँकेवर प्रशासक नेमण्याशिवाय पर्याय उरत नसल्याचे स्पष्ट झाल्याने उपनिबंधक कार्यालयातर्फे सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्याकडे तसा प्रस्ताव सादर केलेला आहे.
दरम्यान, या बँकेमध्ये १0४ कोटींच्या ठेवी आहेत. सुमारे ७४ हजार ठेवीदारांनी आपल्या कष्टाचे पैसे बँकेत गुंतविले आहेत. हे गुंतवणूकदार जिजामाता बँकेच्या राजवाडा कार्यालयात तसेच जिल्हा उपनिबंधक कार्यालयात खेटे मारत आहेत. प्रशासक नेमणुकीची शिफारस झाल्याने निर्माण झालेली कोंडी काही प्रमाणात मोकळी झाली आहे. (प्रतिनिधी)
लेखापरीक्षणाचा मार्ग मोकळा...
जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या वतीने जिजामाता सहकारी बँकेचे फेरलेखापरीक्षण सुरू केले होते. सहकार आयुक्तांनी सांगलीचे विशेष लेखा परीक्षक श्रीधर कोल्हापुरे यांची यासाठी नियुक्तीही केली होती. मात्र, बँकेतील दफ्तर मिळण्यात अडचणी निर्माण होत असल्याने हे लेखापरीक्षण अपुरे राहिले आहे. आता बँकेवर प्रशासकाची नियुक्ती झाल्यास लेखापरीक्षणाचा मार्गही मोकळा होणार आहे.