पवार कुटुंबीयातील चौथी पिढी राजकारणात
By admin | Published: February 7, 2017 12:17 AM2017-02-07T00:17:57+5:302017-02-07T00:17:57+5:30
बारामतीतून अजित पवार यांचे चुलत पुतणे रोहित पवार यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी दाखल केली आहे.
पुणे/बारामती : जिल्हा परिषदेच्या आखाड्यात नेत्यांची नवीन पिढी उतरली आहे. बारामतीतून अजित पवार यांचे चुलत पुतणे रोहित पवार यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी दाखल केली आहे. भारतीय जनता पार्टीही यात मागे नसून शिरूरचे आमदार बाबूराव पाचर्णे यांचा मुलगा राहुल न्हावरे गटातून रिंगणात उतरला आहे.
रोहित पवार यांनी बारामती तालुक्यातील शिर्सुफळ-गुणवडी या गटातून अर्ज दाखल केला आहे. पवार कुटुंबीयाची चौथी पिढी या निमित्ताने राजकारणात उतरली आहे. शरद पवार यांचे थोरले बंधू कृषितज्ज्ञ कै. दिनकरराव उर्फ आप्पासाहेब पवार यांचे रोहित पवार नातू आहेत. शरद पवार यांच्या मातोश्री शारदाबाई पवार लोकल बोर्डाच्या सदस्या म्हणून राजकारणात होत्या. त्यानंतर शरद पवार मागील ५० वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत.
अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यानंतर रोहित पवार हे जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने पुणे महापालिकेसाठी खासदार अनिल शिरोळे यांचे चिरंजीव सिद्धार्थ हे निवडणूक लढवित आहेत. पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरातून ते रिंगणात आहेत. अनिल शिरोळे यांनी खासदारकीच्या अगोदर सुमारे २० वर्षे महापालिकेत पक्षाचे प्रतिनिधित्व केले होते. बीई मॅकॅनिकल इंजिनीअर असलेले सिद्धार्थ यापूर्वी भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या माध्यमातून कार्यरत होते.
माजी आमदारांची दुसरी पिढीही राजकारणात
भोर : भोर तालुक्यातील दोन माजी आमदारांची दुसरी पिढी जिल्हा परिषदेच्या राजकारणात उतरत आहे. कॉँग्रेसचे माजी आमदार संपतराव जेधे यांचे चिरंजीव रोहिदास जेधे उत्रौली-कारी गटातून राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारल्याने शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. माजी आमदार शिवाजीराव शिवथरे यांचे चिरंजीव रणजितही जिल्हा परिषदेची निवडणूक लढवित आहेत.
आमदार पाचर्णे यांचे पुत्र रिंगणात
भाजपाचे शिरूर तालुक्याचे आमदार बाबुराव पाचर्णे यांचे पुत्र राहुल पाचर्णे शिरुर ग्रामीण-रांजणगाव गटातातून सध्या अपक्ष जिल्हा परिषद सदस्य आहेत. या निवडणुकीत शिरूर ग्रामीण न्हावरे या गटातून निवडणूक लढवत आहे. राहुल पाचर्णे हे इस्ट्रूमेंन्टेशन अॅण्ड कंट्रोल या शाखेतून अभियांत्रिकी शाखेचे पदवीधर आहेत. याबरोबरच त्यांनी पुण्यातील सिंहगड महाविद्यालयातून एमबीएची पदवी घेतली आहे. ते बांधकाम व्यावसायिक असून, गेल्या ५ ते ७ वर्षांपासून राजकारणात कार्यरत आहेत. शिरुर ग्रामीण-रांजणगाव गटातून ते जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत यापूर्वी निवडून आले आहेत.
वळसे यांचे राजकीय वारसही उतरले
विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांचे राजकीय वारस त्यांचे पुतणे विवेक वळसे-पाटील आंबेगाव तालुक्यातील परगांवतर्फे अवसरी बुद्रूक/ अवसरी बुद्रूक या गटातून निवडणूक लढवत आहेत. विवेक हे राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष असून, खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून तालुक्यात संघटना बांधली.